अनुदानित विज्ञान, कला शाखेचा ‘कट आॅफ’ वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 03:44 PM2019-07-30T15:44:54+5:302019-07-30T16:01:24+5:30
कोल्हापूर शहरातील विविध ३३ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्ध झाली. या फेरीत प्रवेशासाठी एकूण ६ हजार १२९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
कोल्हापूर : शहरातील विविध ३३ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्ध झाली. या फेरीत प्रवेशासाठी एकूण ६ हजार १२९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
पहिल्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत. त्यांना अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची संधी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने दिली होती. त्यात अनेकांनी महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम बदलले. त्यामुळे दुसऱ्या फेरीत अनुदानित विज्ञान, कला शाखेच्या प्रवेशाचा कट आॅफ सरासरी एक ते पाच टक्क्यांनी वाढला आहे. हा कट आॅफ पहिल्या फेरीपेक्षा अधिक आहे. विनाअनुदानित वाणिज्य शाखेचा कट आॅफ घटला आहे.
केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्यावतीने अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पहिल्या फेरीत ज्यांचे प्रवेश प्रलंबित राहिले होते असे आणि ज्यांनी नव्याने अर्ज केलेल्या एकूण ६१२९ विद्यार्थ्यांना समितीने दुसऱ्या फेरीत प्रवेश अॅलॉट केले आहेत. या फेरीत एकूण ९०४५ जागा शिल्लक आहेत. त्यासाठी समितीकडून निवड यादी जाहीर करण्यात आली. त्याची माहिती केंद्रीय समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यादी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली. पावसाची रिपरिप सुरू असतानाही यादी पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी महाविद्यालयांमध्ये गर्दी केली होती.
अनुदानित विज्ञान शाखेत विवेकानंद महाविद्यालयाचा कट आॅफ ‘जैसे-थे’ राहिला. मात्र, न्यू कॉलेज, एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेजचा कट आॅफ सरासरी एक ते दीड टक्क्यांनी वाढला. वाणिज्य इंग्रजी माध्यमाचा कटआॅफ घटला, तर कला शाखेचा वाढला आहे.
या निवड यादीनुसार सकाळी अकरा वाजल्यापासून संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवड यादीतील विद्यार्थ्यांनी बुधवार (दि. ३१) पर्यंत प्रवेश निश्चित करावयाचे आहेत. जर जागा शिल्लक असतील, तर एटीकेटीधारकांना दि. १ आॅगस्टनंतर प्रवेश दिले जातील.
दुसरी फेरी ही अंतिम फेरी असणार आहे. त्याद्वारे अॅलॉट झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असल्याची माहिती चौगुले यांनी दिली. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष प्राचार्य अशोक देशमुख, महाविद्यालयांचे प्रतिनिधी प्रा. टी. के. सरगर, रवींद्र पोर्लेकर, राजेंद्र कोळेकर, अनुपमा साळी, प्रशुद्धचंद्र झपके, विकास पाटील, गणेश काटकर उपस्थित होते.
‘एसईबीएस’मुळे कट आॅफ वाढला
मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ‘एसईबीसी’आरक्षणानुसार अर्जामध्ये बदल करण्याची, आरक्षण नोंदविण्याची संधी केंद्रीय समितीने उपलब्ध करुन दिली. त्यामुळे विविध महाविद्यालयांतील या प्रवर्गाअंतर्गत प्रवेशासाठीचा कट आॅफ सरासरी चार ते पाच टक्क्यांनी वाढला आहे. वाणिज्य इंग्रजी माध्यमासाठी क्षमतेपेक्षा ४८० अर्ज जादा आल्याने डीआरके कॉमर्स कॉलेज, विवेकानंद महाविद्यालय, कमला कॉलेज, न्यू मॉडेल आणि प्रायव्हेट ज्युनिअर कॉलेजला तुकडी वाढवून दिली असल्याचे चौगुले यांनी सांगितले.
पहिल्या प्राधान्यक्रमानुसार ४७८८ जणांना प्रवेश
समितीकडे अर्ज केलेल्या ९२१४ विद्यार्थ्यांपैकी ४७८८ जणांनी नोंदविलेल्या पहिल्या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश देण्यात आला आहे. त्यामध्ये विज्ञान शाखेच्या ५५७३ पैकी २७९३ जणांना, वाणिज्य इंग्रजी माध्यमाच्या १८७० पैकी ५७७ जणांना, तर कला शाखेच्या १७७१ पैकी १४१८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कला शाखेच्या निम्म्याहून जादा जागा रिक्त
शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील एकूण प्रवेशक्षमता १४ हजार ८१६ इतकी आहे. त्यात पहिल्या फेरीत ५००६ आणि व्यवस्थापन व इनहाऊस कोट्यातील ७६५ आणि आता ६१२९ जागा वगळता २९१६ जागा रिक्त राहणार आहेत. त्यातील कला शाखेतील जागा १९४९ इतक्या आहेत.
दुसऱ्या फेरीनंतर एटीकेटी प्रवेश
दुसऱ्या फेरीतील जागा रिक्त राहिल्यास त्यावर एटीकेटीधारकांना प्रवेश देण्यात येईल. तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशासाठी थांबलेल्या, ज्यांनी केंद्रीय समितीकडे अर्ज केलेला नसेल, अशा विद्यार्थ्यांना जागा शिल्लक असल्यास महाविद्यालय पातळीवर प्रवेश देण्याचा अधिकार प्राचार्यांना आहे. दुसऱ्या फेरीनंतर कोणतेही प्रवेश केंद्रीय समितीकडून होणार नसल्याचे चौगुले यांनी सांगितले.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
शाखा क्षमता प्राप्त अर्ज कोटा पहिली फेरी संख्या दुसरी फेरी संख्या एकूण संख्या
कला (मराठी) ३७२० १७७१ १९२ ८५७ ७२२ १७७१
कला (इंग्रजी) १२० ८३ - ६८ १५ ८३
वाणिज्य (मराठी) ३३६० २६०१ १५९ १०२९ १४१३ २६०१
वाणिज्य (इंग्रजी) १४९६ १८७० २४ ७५१ १०९५ १८७०
विज्ञान ५९६० ५५७३ ३९० २३०१ २८८४ ५५७३
एकूण १४८१६ ११८९८ ७६५ ५००६ ६१२९ ११८९८
यावर्षीची शाखानिहाय टक्केवारीसह ‘कट आॅफ लिस्ट’
महाविद्यालय विज्ञान वाणिज्य (मराठी) वाणिज्य (इंग्रजी) कला
राजाराम कॉलेज ८९.२० - - ५७.८०
न्यू कॉलेज ९१.२० - - ६९.००
एस. एम. लोहिया ९१.२० - - ५८.००
विवेकानंद ९०.०० ८२.४० ८६.०० ५१.४०
गोखले कॉलेज ८०.८० ६२.४० - ३७.४०
महाराष्ट्र हायस्कूल ८६.२० ८३.८० - ६३.८०
मेन राजाराम हायस्कूल ८४.४० ७८.२० - ५५.२०
शाहू कॉलेज, कदमवाडी ७९.६० ६४.०० - ३६.००
कमला कॉलेज ८३.८० ७२.८० - ४३.००
विद्यापीठ ज्युनिअर ८०.८० ७०.०० - ५२.६०
पद्माराजे ज्युनिअर ८५.४० ६९.८० - ३८.६०
बी. एम. रोटे ज्युनिअर - ६५.६० - ४९.००
शहाजी कॉलेज - ६८.८० - ४७.२०
डीआरके कॉमर्स कॉलेज - ७८.६० ९०.८० -
डी. डी. शिंदे सरकार कॉलेज - - ८३.६० -
शाहू महाराज ज्युनिअर ८०.०० - - ५३.६०
या कागदपत्रांची आवश्यकता
- मूळ गुणपत्रिका,
- शाळा सोडल्याचा मूळ दाखला (त्यावर युडायस नंबर असणे आवश्यक),
- आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला,
- आधारकार्डच्या दोन छायांकित प्रती, दोन छायाचित्रे,
- विद्यार्थिनींसाठी प्रतिज्ञापत्र.