पालकांना न सांभाळणाऱ्यांच्या पगारात कपात करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:22 AM2020-12-08T04:22:25+5:302020-12-08T04:22:25+5:30
कोल्हापूर : आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ३० टक्के रक्कम कपात करून ती आई-वडिलांच्या खात्यावर जमा करावी, ...
कोल्हापूर : आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ३० टक्के रक्कम कपात करून ती आई-वडिलांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी जनसुराज्य पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे यांनी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
जे जिल्हा परिषद कर्मचारी आपल्या आई-वडिलांना सांभाळत नाहीत अशांच्या वेतनातील ३० टक्के रक्कम कपात करण्यात यावी आणि ती रक्कम आई-वडिलांच्या खात्यामध्ये जमा करावी, असा ठराव लातूर जिल्हा परिषदेने केला आहे. त्याच धर्तीवर मोरे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना भेटून ही मागणी लेखी निवेदनाद्वारे केली.
आई-वडिलांचा सांभाळ करण्याची मुलांची नैतिक जबाबदारी आहे. मात्र, अनेकजण ती पार पाडत नाहीत. कायदेशीर पोटगी मागण्याचा पालकांना हक्क आहे. मात्र, या वाटेने कोणी जात नाही म्हणूनच किमान जिल्हा परिषद, पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्याबाबतीत तरी असा निर्णय घ्यावा, असे पत्रात मोरे यांनी म्हटले आहे.