संपावर गेल्यास तीन कोटी ६० लाखांचा पगार कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:02 AM2018-05-28T01:02:57+5:302018-05-28T01:02:57+5:30
रमेश पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : युनायटेड फोरम्स बॅँक युनियनने ३० व ३१ मे रोजी पुकारलेल्या संपात कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याने त्यांचा पुढील महिन्यात दोन दिवसांचा पगार कापला जाणार आहे. पगार कापण्यात येणारी रक्कम सुमारे तीन कोटी ६० लाख रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.
बॅँकेच्या क्लार्क, अधिकारी, शिपाई व वरिष्ठ अधिकारी यांचा महिन्याला सरासरी ६० हजारांच्या घरात पगार आहे. म्हणजेच प्रत्येक दिवशी दोन हजार रुपये सरासरी पगार पडतो. दोन दिवस संपावर गेल्यास प्रत्येकी चार हजार रुपयांची कपात होणार आहे. ही सर्व रक्कम मिळून तीन कोटी ६० लाख इतकी होते. जून महिन्याच्या पगारातून ही रक्कम कापली जाणार आहे.
बॅँकांचा पगार हा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी होतो. मे महिन्याचा पगार झाल्यानंतर हा संप होत आहे. त्यामुळे पगाराची रक्कम जूनमध्ये कापण्यात येणार आहे. प्रत्येक संपावेळी पगार रक्कम कापली जाते. मात्र पगार कापला जातो म्हणून कोणीही कर्मचारी संप करण्याचे टाळत नाहीत. संप केल्यावर पगार कपात होणार हे गृहीत धरूनच संप केला जातो. संपूर्ण देशभरातील कर्मचारी या संपात उतरले असून त्या सर्वांचा पगार कापला जाणार आहे.
इंडियन बॅँक्स असोसिएशनतर्फे वेतन करारास विलंब होत असल्यामुळे या संपाची हाक देण्यात आली आहे. या संपात देशभरातील सुमारे १० लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. १ नोव्हेंबर २०१७ पासून नवीन वेतनवाढ लागू होणे अपेक्षित होते. मात्र वेतन करारास सात महिन्यांहून अधिक उशीर झाल्याने व इंडियन बॅँक्स असोसिएशनच्या उदासीनतेमुळे बॅँक कर्मचारी व अधिकारी यांना संपावर जावे लागत असल्याचे संघटनांचे मत आहे.
कोल्हापुरात ३० व ३१ मे रोजी बॅँक कर्मचारी संघटना स्टेट बॅँकेच्या व बॅँक आॅफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी शाखेच्या दारात निदर्शने करणार आहेत. या संपामुळे कोट्यवधी रुपयांचा व्यवहार ठप्प होणार आहे. या काळात एटीएमच्या व्यवहारात वाढ होऊ शकते.