राज्यात ‘सायबर क्राईम’ फोफावतेय
By admin | Published: January 4, 2017 01:06 AM2017-01-04T01:06:12+5:302017-01-04T01:06:12+5:30
नोटाबंदीमुळे गुन्हे वाढणार : तक्रारीत वाढ, १४२ टक्के गुन्हे वाढले; जनतेची आर्थिक सुरक्षा सरकारपुढे आव्हान
आप्पासाहेब पाटील --कोल्हापूर --केंद्र सरकारच्या नोटाबंदी व ‘गो कॅशलेस’च्या धोरणाचे देशभरात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूंूनीकमालीचे मंथन होत आहे. जनतेचा ‘कॅशलेस’कडे ओढा वाढला असला तरी यातील गैरसोय, कराचे प्रमाण व त्यातच सायबर गुन्हेगारांच्या वाढत्या घुसखोरीने जनता हैराण होऊ लागली आहे. देश, राज्य, शहर ते थेट गावांपर्यंत सायबर गुन्हेगार पोहोचल्याने जनतेची आर्थिक सुरक्षा हे सरकारी यंत्रणांपुढेच आव्हानच असेल.
मोबाईल संपर्क करून बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून बँकेतील खाते नंबर, एटीएम पीन, सीव्हीसी नंबर माहिती करून घेत खात्यांवरील रकमा परस्पर लंपास करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात हुपरी, शिरोळ, जयसिंगपूर, पेठवडगाव येथे असे गंडा घालण्याचे प्रकार सायबर गुन्हेगारांकडून झालेले आहेत. अनेक ठिकाणी मोेठ्या रकमा लंपास न झाल्याने पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झालेल्या नाहीत. यातील कोणतेही गुन्हेगार सापडत नसताना अजूनही अनेकांना बँका, आयकर व सीबीआयमधून बोलत असल्याचे सांगून सायबर गुन्हेगारांकडून अनेकांना फोन येत आहेत. जे सतर्क आहेत, ते मात्र फसत नाहीत. काही दिवसांपूर्वी जयसिंगपूरजवळ एका शिक्षकाला कोटीचा आॅनलाईन जॅकपॉट लागल्याच्या आमिषाने ३२ लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे. अशा फसवणुकीचे सर्रास प्रकार सुरू असतानाच आता आॅनलाईन वॉलेट पेंमेटमधील फसवणुकीच्या तक्रारी वाढत आहेत. एकीकडे ‘कॅशलेस’ व्यवहाराचा सरकारकडून आग्रह केला जात असताना त्यामध्ये सुरक्षिततेतील दुवे पकडून सायबर हॅकर वॉलेट पेमेंट करणाऱ्यांना गंडा घालत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे व कोल्हापूरपर्यंत तक्रारी वाढताना दिसत आहेत. एवढेच नव्हे, तर सायबर गुन्हेगारांनी बँकांची बनावट क्रेडिट कार्ड काढून दीड कोटींचा गंडा घालण्याचा प्रकार नुकताच मुंबईत उघडकीस आला. बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेतून ३२ जणांना स्टेट बँकेची क्रेडिट कार्ड दिली गेली. मात्र, बँकेने या कार्डधारकांचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला असता ते बोगस असल्याचे निष्पन्न झाले. तोपर्यंत ही बनावटगिरी करणाऱ्या तिघांनी बँकेचे एक कोटी ४० लाख लंपास केले होते. हा प्रकार २०१३ ते २०१५ या कालावधीत झाला. यामधील सायबर क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुण्यात नुकतेच दोघा सायबर गुन्हेगारांनी एसबीआयची ७२ क्रेडिट कार्ड दुसऱ्याच खातेदारांच्या नावे मिळवून मोठा गंडा घातल्याचे सायबर क्राईम ब्रँचने उघडकीस आणले आहे. यामध्ये बँकेच्या एका खातेदाराला कोणतेही क्रेडिट कार्ड न घेता ९० हजारांच्या आऊटस्टँडिंगचा मेसेज व कॉल सेंटरमधून फोन आला. त्यानंतर त्याने बँकेत तक्रार दिल्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले. अटक केलेल्या दोघांपैकी एकजण बँकेस सर्व्हिस प्रोव्हाईड करणारा असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या आॅक्टोबरमध्ये पुणे सायबर क्राईम ब्रँचने इंदूरमध्ये एका कॉल सेंटरवर छापा टाकून ते चालविणाऱ्या तिघांना अटक केली. या सेंटरने फोनवरून तीन दिवसांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली व कोल्हापूर येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गंडा घातला आहे. सुरुवातीला रक्कम आॅनलाईन जमा करून नंतर मोठ्या रकमा जमा झाल्यानंतर त्या देण्यास नकार देणे, असे या टोळीचे काम सुरू होते. कोल्हापुरातही अलीकडे हुपरी, कागल, शिरोळ, जयसिंगपूर व कोल्हापूर शहरात सायबरचे गुन्हे घडले आहेत.
१ जानेवारी २०१६ ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत एकट्या पुण्यात सायबर गुन्हे शाखेकडे ११०३ सायबर गुन्ह्यांशी संबंधित तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे सायबर क्राईम ब्रँच कमालीच्या हैराण झाल्या आहेत. सायबर गुन्हेगारांकडून लोकांनी फसले जाऊ नये, यासाठी जनजागृतीचे उपक्रम पोलिसांकडून राबविले जात आहेत.
कोल्हापूर विभागातही सायबर गुन्हेगारी वाढू लागल्याचे या विभागाकडे दाखल झालेल्या तक्रारींच्या आकडेवारीवरून स्पष्ट होऊ लागले आहे. कोल्हापूर विभागात २०१५ या वर्षात आयटी अॅक्ट व आयपीसीखाली कोल्हापूर (९), पुणे ग्रामीण (४४), सांगली (२५), सातारा (२३) व सोलापूर (६) इतके गुन्हे नोंदले गेले आहेत. ही आकडेवारी नजरेत भरणारी आहे.
सायबर गुन्ह्यांमध्ये १८ ते ३० आणि ३० ते ४५ वयोगटातील आरोपींची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये आयटी क्षेत्रात मोठ्या पदावर काम करणारा तज्ज्ञ वर्ग गुरफटल्याचे दिसून येत आहे.