आरोग्यासह पर्यावरणास पूरक ठरतेय सायकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:27 AM2021-08-28T04:27:11+5:302021-08-28T04:27:11+5:30
- सचिन भोसले कोल्हापूर : जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे पुन्हा जुन्या गोष्टींना महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. सायकल ...
- सचिन भोसले
कोल्हापूर : जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे पुन्हा जुन्या गोष्टींना महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. सायकल ते मोपेड व्हाया मोटारसायकल ते चारचाकी आणि पुन्हा सायकल असे अक्षरश: सायकल या शब्दाप्रमाणे गोल सर्कल पूर्ण होत आहे. सलग दोनवेळा कोरोनाची लाट आल्यानंतर अनेकांना व्यायामाचा प्रश्न होता. त्यात सायकलचे पॅडल पुन्हा मारण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात सायकलिंगचे ग्रुप बनू लागले आहेत. विशेषत: लॉकडाऊन काळात सायकलची तडाखेबंद विक्री झाली.
विशेषत: लॉकडाऊन काळात घरी बसून अनेकांचे वजन वाढले. त्यामुळे अनेकांनी स्थूलता कमी करण्यासाठी महागड्या सायकली खरेदी केल्या. कोल्हापुरातील उपनगरांतील अनेक रस्ते जणू सायकलचे ट्रॅकच बनले होते. अनेक रस्त्यांवर, कॉलनीत सायकलपटूंचे जथेच्या जथेच बाहेर पडत होते. पूर्वी शाळा, महाविद्यालय, थिएटर, सरकारी कचेऱ्यांमध्ये सायकल स्टँड असायचे. गेल्या काही वर्षांचा अपवाद वगळता, अनेक स्टँडची जागा दुचाकी आणि चारचाकी पार्किंगने घेतली आहे. मुलगा आठवीला गेला की, अनेक पालक मुलांना शाळेला जाण्यासाठी सायकल घेत असत. दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर पाल्याला हिरो, हर्क्युलस, बीएसए अशा नामांकित कंपन्यांची सायकल भेट म्हणून देत असत. मात्र, काळाच्या ओघात त्यांची जागा मोपेड, दुचाकी, मोटारसायकल आणि चारचाकीने घेतली. त्याचबरोबर शरीराचा व्यायामही थांबला. काळाचा महिमा म्हणा किंवा गरज म्हणून, आता नव्याने अनेक घरात सायकली दिसत आहेत. विशेषत: एका घरात मुलगा, आई, बाबा आणि मुलगी यांच्या चार सायकली दिसत आहेत. अनेकांना अभिनेता आमिर खानचा ‘जो जीता वही सिकंदर’ हा चित्रपट आज पुन्हा हवा-हवासा वाटत आहे. या चित्रपटानंतर सायकलमध्ये गियरची क्रेझ आली. रेसर, रेंजर अशा सायकलीही आल्या. जीममध्येही सायकल आली. मात्र ती एकाच जागी असणारी सायकल होय. ही केवळ बसून तेथेच पॅडल मारून व्यायाम करण्यासाठी होती. त्यातही सुधारणा होऊन अनेक पर्यावरणप्रेमींनी मोकळ्या रस्त्यांवर सायकल चालवून पर्यावरणाचा समतोल राखायचा आहे. याची जागृती करणारे क्लब, ग्रुप वाढले आहेत. विनाइंधन सायकलचे महत्त्वही अनेकजण आपल्या जनजागृती मोहिमेत विषद करू लागले आहेत.
रविवारी ट्रीप सुरू झाली...
पूर्वी शनिवारी शाळा सुटल्यानंतर त्याचदिवशी दुपारी किंवा रविवारी सकाळी कोल्हापुरातील अनेक शाळकरी, महाविद्यालयीन युवक पन्हाळा, जोतिबा, न्यू पॅलेस अशा ठिकाणी ट्रीप काढत असत. आता तीच प्रथा सुरू होऊन दर रविवारी जोतिबा, कात्यायनी, पन्हाळा, राधानगरी अशा विविध ठिकाणी ग्रुपने ट्रीप काढणारे क्लब आणि ग्रुप निर्माण झाले आहेत. व्यायामासह शुद्ध ऑक्सिजन या ट्रीपमधून मिळतो. त्यामुळे असे ग्रुप कोल्हापुरात वाढू लागले आहेत.
फायदे असे...
- सायकलिंगमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो.
- सायकलिंगमुळे शरीर तंदुरुस्त राहते. शरीरातील हालचाली वेगवान झाल्यामुळे रक्ताभिसरण वाढते. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. स्नायू बळकटीकरण होते. वजन नियंत्रणात राहते. शुद्ध हवा आणि व्यायामाचा आनंद मिळतो.
साडेतीन लाखांच्या सायकली कोल्हापुरात...
कोल्हापुरातील आर्यनमन आकाश कोरगावकर, आदित्य शिंदे, चेतन चव्हाण, अक्षय चौगुले, नितीश कुलकर्णी, अशा अनेकजणांकडे साडेतीन लाखांच्या सायकली आहेत. या सायकलींचा वापर ते आर्यनमॅनसारख्या खडतर स्पर्धेच्या तयारीसाठी करीत आहेत. तसेच अनेक हौशी सायकलपटूंकडेही साडेतीन ते पाच लाखांपर्यंतच्या सायकली आहेत. पोलीस खात्यातील एक उच्चपदस्थ अधिकारीही सायकलप्रेमी आहे. त्याच्याकडे जवळजवळ १२ सायकली आहेत. त्यांच्या किमती ८० हजारांपासून पाच लाखांपर्यंत आहेत. ते अधिकारी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याशी संबंधित आहेत.