पर्यावरणासह आरोग्यासाठी सायकलिंग उपयुक्त : चंद्रकांतदादा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 02:12 PM2017-10-08T14:12:05+5:302017-10-08T14:14:15+5:30
पर्यावरण आणि आरोग्यासाठी सायकलिंग उपयुक्त असून घरोघरी सायकल असणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरात रविवारी व्यक्त केले.
कोल्हापूर,8 : पर्यावरण आणि आरोग्यासाठी सायकलिंग उपयुक्त असून घरोघरी सायकल असणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरात रविवारी व्यक्त केले.
कोल्हापूर स्पोर्टस क्लबच्यावतीने शहरातील विविध भागामधून सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ दसरा चौकातील राजर्षि शाहु महाराजांच्या पुतळयापासून चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, शहर वाहतूक पोलीस निरिक्षक अशोक धुमाळ, कोल्हापूर स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण, उपाध्यक्ष डॉ.विजय कुलकर्णी, सेक्रेटरी उदय पाटील, विश्वविजय खानविलकर, नगरसेवक राहुल माने यांच्यासह क्लबचे पदाधिकारी, सायकलपटू उपस्थित होते.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आरोग्यासाठी उपयुक्त ठरणाºया सायकलिंगचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पर्यावरण प्रदुषण रोखण्यासही सायकल अतिशय उपयुक्त असल्याचे आहे. देशासह राज्यातील अनेक शहरात आता सायकलसाठी स्वतंत्र ट्रॅक निर्माण होत आहेत. जनतेने स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या सदृढ आरोग्यासाठी आणि पर्यावरण प्रदुषण नियंत्रणासाठी सायकलचा अधिकाधिक वापर करणे काळाची गरज आहे. याबरोबरच पर्यावरण प्रदुषण नियंत्रणासाठी आठवडयातून एक दिवस नो व्हेईकल डे करणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर टाळून शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी इंडिया, आशिया आणि युनिक बुक आॅफ रेकॉर्ड नोंदविणारा संभाजीनगर येथील सहा वर्षाच्या वरद चंदगडकर व पृथ्वीराज शहापूरे याचा चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान, राजर्षि शाहू महाराजाच्या पुतळ्यास पाटील यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन दसरा चौकातून या रॅलीस सुरुवात झाली.बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, उमा टॉकिज, राजारामपुरी रोड, टेंबलाईवाडी उड्डाण पुल, कावळा नाका, धैर्यप्रसाद हॉल, जिल्हाधिकारी कार्यालयापासून पुन्हा दसरा चौकात या या रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये कोल्हापूर स्पोर्टस क्लबचे खजिनदार आशिष तंबाके, वैभव बेळगांवकर, डॉ. संदेश बागडे, उत्तम फराकटे, महेश कदम, आदित्य शिंदे यांच्यासह लहान मुले-मुली तसेच महिला, दीडशेहून अधिक सायकलपटू सहभागी झाले होते.
कोल्हापूरात २९ ला ट्रायथ्लॉन, इयु्थ्लॉन स्पर्धा
कोल्हापूर स्पोर्टस क्लबच्यावतीने ट्रायथ्लॉन आणि इयूथ्लॉन या आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा २९ ला प्रथमच कोल्हापूरात होत आहे. या स्पधेर्चे औचित्य साधून स्थानिक खेळाडूंचा यामध्ये अधिकाधिक सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने आजची सायकल रॅली काढण्यात आल्याचे चेतन चव्हाण यांनी सांगितले. या क्रीडास्पर्धा यशस्वी करण्याबरोबरच यामध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंचा सहभाग वाढवावा, यादृष्टीनेही या क्लबने पुढाकार घ्यावा असे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.