गडहिंग्लजकर पर्यावरणासाठी चालविणार सायकल

By Admin | Published: December 31, 2016 01:16 AM2016-12-31T01:16:09+5:302016-12-31T01:16:09+5:30

सायकल क्लबची स्थापना : विविध सेवाभावी संस्था, संघटनांचा सहभाग; आणखी एक पुरोगामी पाऊल --गुड न्यूज

Cycling will be run for the Gadhingljkar environment | गडहिंग्लजकर पर्यावरणासाठी चालविणार सायकल

गडहिंग्लजकर पर्यावरणासाठी चालविणार सायकल

googlenewsNext

राम मगदूम--गडहिंग्लज
वाढत्या वायू व ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याबरोबरच इंधन व पैशांची बचत आणि शहरातील वाहतुकीच्या समस्येची कोंडी फोडण्यासाठी सायकलीचा अधिकाधिक वापर करण्याचा निर्धार गडहिंग्लजकरांनी केला आहे. सरत्या वर्षाला अभिनव पद्धतीने निरोप देताना नियमित सायकल चालविण्याचा संकल्प सोडून गडहिंग्लजकरांनी आणखी एक पुरोगामी पाऊल टाकले आहे. पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘गो ग्रीन गडहिंग्लज’ या उपक्रमात विविध सेवाभावी संस्था, संघटना उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या आहेत.
गोवा आणि कोकणचे प्रवेशद्वार आणि कोल्हापूर जिल्ह्याची दक्षिण राजधानी म्हणून गडहिंग्लजकडे पाहिले जाते. ‘शांतताप्रियनगरी’ हेच या गावचे वैशिष्ट्य आहे. वाढत्या नागरीकरणातून नगरपालिका अस्तित्वात आली तरी शहराने गावपणाची बाज आजही अबाधित राखली आहे. त्यामुळेच ‘राजकारण’ निवडणुकीपुरतेच मर्यादित ठेवून विविध सामाजिक उपक्रमांत गडहिंग्लजकर नेहमीच हिरिरीने भाग घेतात, याचा प्रत्यय कित्येकवेळा आला आहे.
‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा फतवा शासनाकडून येण्यापूर्वीच येथील पालिकेने नागरिकांच्या सहकार्याने वृक्षलागवडीचा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे जोपासला आहे. त्यामुळेच पालिकेला ‘राज्याचा वनश्री’ पुरस्कार मिळाला आहे. संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानातही राज्यस्तरावर धडक मारली आहे. हागणदारीमुक्तीबद्दल एक कोटीचे अनुदानही पालिकेला नुकतेच मिळाले आहे. तथापि, वाहनांची वाढती संख्या आणि पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे शहरातील मुख्य रस्ता व बाजारपेठेत नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे अनेकदा लहान-मोठे अपघात होतात. प्रसंगी जीवितहानीदेखील होते. त्यावर उपाय म्हणूनच सायकल वापरण्याचा निर्णय गडहिंग्लजकरांनी घेतला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्याबरोबरच नागरिकांना शारीरिक तंदुरुस्ती आणि सुरक्षित वाहतुकीचा फायदा होणार आहे. त्यातूनच निसर्गाचे व पर्यावरणाचेही संरक्षण होण्यास मदत होणार आहे.

सहभागी झालेल्या संस्था
लायन्स क्लब, रोटरी क्लब, युनिव्हर्सल फ्रें डस् सर्कल, केदारी रेडेकर फौंडेशन, हिरण्यकेशी फौंडेशन, सह्याद्री अ‍ॅडव्हेंचर्स, प्रोग्रेसिव्ह ग्रुप, राजर्षी शाहू सामाजिक सेवा संस्था, गडहिंग्लज चेंबर आॅफ कॉमर्स, वृक्षमित्र व पर्यावरणप्रेमी संघटना, तरुण व महिला मंडळे.
सायकल का वापरायची?
व्यायाम, प्रदूषण टाळणे, इंधन व पैशाची बचत, वाहतुकीची कोंडी दूर होणे, अपघात टाळणे, दीर्घायुष्य, यासाठी सायकल वापरणे आवश्यक आहे.
आवाहन सदस्यत्वासाठी
शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, उद्योजक, शासकीय अधिकारी आणि अन्य अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी नियमित, आठवड्यातून व महिन्यातून सातत्याने सायकल वापरून या क्लबचे सदस्य व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Cycling will be run for the Gadhingljkar environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.