वय वर्ष अवघे दहा; ३ हजार ६०० किलोमीटरचा करणार प्रवास, का करत आहे इतका प्रवास जाणून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 06:39 PM2022-01-08T18:39:36+5:302022-01-08T18:43:23+5:30
कमी वयात सामाजिक बांधीलकी जपत इतक्या लांबचा प्रवास करण्याची सईची जिद्द पाहून अनेकजण भारावून जात आहेत.
कोल्हापूर : काश्मीर येथून आव्हानात्मक प्रवास करत ठाण्याची सई आशिष पाटील ही दहा वर्षाची सायकलपटू गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास कोल्हापुरात पोहोचली. करवीरनगरीत शिवराष्ट्र हायकर्स आणि मदत फाउंडेशनतर्फे तिचे जंगी स्वागत करण्यात आले. येथून शुक्रवारी दुपारी बारा वाजता ती कन्याकुमारीकडे रवाना झाली.
‘सेव्ह गर्ल, टिच गर्ल, सेव्ह नेचर’ असा संदेश देत प्रबोधन करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी असा सुमारे ३ हजार ६०० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करून ती विश्वविक्रम नोंदविणार आहे.
करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनानंतर सकाळी अकरा वाजता शाहू छत्रपती यांच्या हस्ते सईचा सत्कार झाला. त्यांनी सईला शुभेच्छा दिल्या. खासदार संभाजीराजे, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते सईचा सत्कार झाला. यावेळी मदत फाऊंडेशनचे अध्यक्ष मदन पाटील, डॉ. संदीप पाटील, शिवराष्ट्र हायकर्सचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, मोहन खोत, सायकल असोसिएशनचे अरुण सावंत, नीलेश साळोखे, साधना साळोखे, विनायक जरांडे, पवन पाटील, आदी उपस्थित होते.
कोल्हापुरातील महाराणी ताराराणी पुतळा येथून सईला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पुढील दोन हजार किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी ती दुपारी बारा वाजता कन्याकुमारीकडे रवाना झाली. या सायकल मोहिमेत सईचे वडील आशिष, आई विद्या, साई पाटील, अक्षय पाटील, सुमित कोटकर, राज भोईर, बाबू भोईर, राजेश पाटील, अक्षय पाटील सहभागी आहेत.
अनेकजण भारावले
मुलगी आणि पर्यावरण वाचवा असा संदेश देशाला देण्यासाठी मी काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास करत आहे. मला पुढे नौदल करिअर करून देशसेवा करायची असल्याचे सई हिने सांगितले. कमी वयात सामाजिक बांधीलकी जपत इतक्या लांबचा प्रवास करण्याची सईची जिद्द पाहून अनेकजण भारावून जात आहेत.