‘सीझेडटीएस’ची गॅस सेन्सर उपयुक्तता सिद्ध
By admin | Published: March 3, 2016 12:19 AM2016-03-03T00:19:53+5:302016-03-03T00:23:47+5:30
शिवाजी विद्यापीठातील संशोधन : आंतरराष्ट्रीय सामंजस्य करारातून साकारले पेटंट
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आणि दक्षिण कोरियातील चोन्नम राष्ट्रीय विद्यापीठातर्फे संशोधनामधून एका महत्त्वपूर्ण कोरियन पेटंटची निर्मिती झाली आहे. ‘कॉपर झिंक टिन सल्फाईड’ या पदार्थाचा गॅस सेन्सरसाठी उपयोगाबाबतचे हे पेटंट आहे, अशी माहिती या संशोधन संघाचे सदस्य प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांनी मंगळवारी दिली.चोन्नम राष्ट्रीय विद्यापीठासमवेत शिवाजी विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार आहे. या कराराअंतर्गत चोन्नम राष्ट्रीय विद्यापीठात संशोधन करणाऱ्या डॉ. किशोर गुरव आणि प्रा. जे. एच. कीम यांनी तेथून फाईल केलेल्या या पेटंटवर डॉ. लोखंडे यांच्यासह चोन्नममधील डॉ. जे. एच. मून, एस. डब्ल्यू. शिन यांनी सहसंशोधक म्हणून काम केले. डॉ. गुरव यांना नॅशनल रिसर्च फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली. त्याअंतर्गत त्यांनी ‘सीझेडटीएस बेस्ड सोलार सेल’ या विषयावर काम केले. या संशोधनातून सीझेडटीएस हे गॅस सेन्सर म्हणून चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकते, हे त्यांनी सिद्ध केले. (प्रतिनिधी)
अशी झाली पेटंट निर्मिती
सीझेडटीएस हे बहुपयोगी मूलद्रव्य आहे. सौरघटांमध्ये सिलिकॉन, कॉपर इंडियम गॅलियम सेलेनाईड अथवा कॅडमियम टेल्युराईड ही मटेरियल वापरली जातात. कॅडमियम हे विषारी तर इंडियम, गॅलियम, टेल्युराईड हे महागडे पदार्थ आहेत. या पदार्थांऐवजी जस्त व टीन हे स्वस्त पदार्थ वापरून सीझेडटीएस मटेरियल बनविले जाते. त्याचा उपयोग सोलार सेलसाठी केला जात असल्याचे डॉ. लोखंडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘सीझेडटीएस’चा उपयुक्त गुणधर्म म्हणजे त्याची स्थिरता. याच गुणधर्माचा विचार करून संशोधकांनी त्याची गॅस सेन्सरमधील उपयुक्तता सिद्ध केली. पूर्वी पॉलिमरचा गॅस सेन्सरमध्ये वापर केला जायचा; परंतु पॉलिमर स्थिर नसल्याने तो सेन्सर अधिक काळ वापरता येत नसे. सीझेडटीएसच्या प्राथमिक गुणधर्माचा विचार केल्यामुळेच त्याचा सोलार सेलबरोबरच गॅस सेन्सर म्हणूनही उपयोग केला जाऊ शकतो, हे या पेटंटमधून सिद्ध झाले.