डी. टी. शिर्के यांनी कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारली : प्रभारी कुलगुरूंना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:25 PM2020-10-08T12:25:25+5:302020-10-08T12:28:29+5:30
Shivaji University, kolhapurnews, kulguru मला मिळालेल्या संधीमुळे आज विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, आदी घटकांमध्ये ते स्वत: कुलगुरू झाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्याचे समाधान, आनंद वाटत आहे. कुलगुरुपदाबरोबर सन्मान, अधिकार, जबाबदारी या गोष्टीही येतात. त्यातील जबाबदारी मी काळजीपूर्वक स्वीकारत आहे. आपण सर्वांना जबाबदारीने काम करून शिवाजी विद्यापीठाला पुढे नेऊया, असे आवाहन नूतन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी येथे केले.
कोल्हापूर : मला मिळालेल्या संधीमुळे आज विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, आदी घटकांमध्ये ते स्वत: कुलगुरू झाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्याचे समाधान, आनंद वाटत आहे. कुलगुरुपदाबरोबर सन्मान, अधिकार, जबाबदारी या गोष्टीही येतात. त्यातील जबाबदारी मी काळजीपूर्वक स्वीकारत आहे. आपण सर्वांना जबाबदारीने काम करून शिवाजी विद्यापीठाला पुढे नेऊया, असे आवाहन नूतन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी येथे केले.
कुलगुरू दालनात डॉ. शिर्के यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडून कार्यभाराच्या पत्राचे हस्तांतरण आणि ज्ञानदंड स्वीकारून कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर राजर्षी शाहू सभागृहातील सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी कुलगुरू, शिक्षक, आदींनी मला काम करण्याची संधी दिली. त्यातून मी घडत गेलो. आज मला मिळालेले कुलगुरुपद हे मला घडविणाऱ्या सर्वांना अर्पण करतो.
विद्यापीठाच्या एनआरआयएफ रँकिंगच्या दृष्टीने दिशादर्शक योजना राबविल्या जातील. विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. विद्यापीठाच्या विकासासाठी कोठेही कमी पडणार नाही. डॉ. करमळकर यांची अल्प कारकिर्दही संस्मरणीय ठरल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रातील विद्यापीठांनी एकत्रित येऊन शिक्षणाचा नवा पूल बांधल्यास विद्यार्थ्यांना अनेक संधी निर्माण होतील. गरीब, वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांनी सचोटीने प्रयत्न करावेत. या विद्यापीठाशी असलेले ऋणानुबंध गेल्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत अधिक वृद्धिंगत झाल्याचे प्रभारी कुलगुरू डॉ. करमळकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, भारती पाटील, धैर्यशील पाटील, अमित कुलकर्णी, बाबा सावंत, हेमांगी कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. करमळकर यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी डॉ. शिर्के यांच्या पत्नी सुनीता, मुलगी श्रद्धा, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, आदी उपस्थित होते. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी प्रास्ताविक केले. परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी आभार मानले.
शिवरायांना अभिवादन
कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास कुटुंबीयांसमवेत अभिवादन केले. त्यापूर्वी त्यांनी संख्याशास्त्र विभागात थांबून प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, आदींच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
विद्यापीठांनी विचार करावा
ऑनलाईन शिक्षणाची साधने नसल्याने जगभरातील सुमारे ९० लाख विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. आपल्याकडील अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठांनी एकत्रित येऊन प्रयत्न करावेत. त्यादृष्टीने विचार करावा, असे आवाहन डॉ. करमळकर यांनी केले.