मंत्री सतेज पाटीलांची बिनविरोधची गाडी सुसाट, आता असळजच्या साखर कारखान्याचीही केली हॅट्ट्रिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 04:11 PM2022-01-01T16:11:47+5:302022-01-01T16:20:58+5:30
पालकमंत्री सतेज पाटील यांची जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड अधिक घट्ट होत आहे.
कोल्हापूर : विधान परिषद, जिल्हा बँकेनंतर आता असळज (ता. गगनबावडा) येथील डी. वाय. पाटील साखर कारखानाही बिनविरोध करण्यात पालकमंत्री सतेज पाटील यांना यश आले आहे. साखर कारखान्यांसाठी छाननीनंतर २१ जागांसाठी २१ जणांचेच अर्ज शिल्लक राहिले आहेत. बिनविरोधची अधिकृत घोषणा १७ जानेवारी रोजी होणार आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांची जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड अधिक घट्ट होत आहे. विधानसभेनंतर ‘गोकुळ’ निवडणुकीत पाटील यांनी सत्तांतर केले. विधान परिषद निवडणूक जोरात होईल, असे वाटत असतानाच राजकीय मुत्सद्दीगिरीच्या बळावर तेही बिनविरोध करून समर्थकांसह विरोधकांना धक्का दिला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गगनबावडा विकास संस्था गटातून ते बिनविरोध निवडून आले.
असळज येथील डी. वाय. पाटील साखर कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. कोल्हापूर व सिंधुदुर्ग दोन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्याच्या २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. २१ जागांसाठी ४० अर्ज दाखल झाले होते. १९ जणांनी प्रत्येकी दोन तर दोघांनी एक-एकच अर्ज दाखल केला होता. या अर्जांची शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी छाननी केली.
यामध्ये सर्व अर्ज वैध ठरले. अर्ज माघारीची मुदत १७ जानेवारीपर्यंत असून त्या दिवशीच बिनविरोधची अधिकृत घोषणा होणार आहे. बिनविरोध संचालक मंडळात पालकमंत्री सतेज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील यांच्यासह २१ जणांचा समावेश आहे.