डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठ शैक्षणिक विकासात भर घालेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:22 AM2021-04-11T04:22:46+5:302021-04-11T04:22:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : डॉ. संजय डी. पाटील यांनी मेहनतीने तळसंदेच्या माळरानावर नंदनवन फुलवले आहे. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवे पारगाव : डॉ. संजय डी. पाटील यांनी मेहनतीने तळसंदेच्या माळरानावर नंदनवन फुलवले आहे. या ठिकाणी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ स्थापन करून कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध केल्या आहेत. हे विद्यापीठ राज्याच्या शैक्षणिक विकासात भर घालेल, असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.
तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ कॅम्पसला भेटप्रसंगी कृषिमंत्री दादा भुसे बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
डॉ. संजय पाटील यांनी विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या अनेक आधुनिक व नावीन्यपूर्ण संकल्पनांबाबत मंत्री दादा भुसे यांना माहिती दिली. सेंद्रिय पद्धतीने घेण्यात आलेल्या विविध पिकांबद्दल व शेतीतील अनेक प्रयोगांबद्दल यावेळी सविस्तर चर्चा केली. कॅम्पसमधील शेतीची सफर घडवत येथे घेतला जात असलेला भाजीपाला, फळपिके यांची माहिती कृषिमंत्र्यांना देण्यात आली.
कृषिमंत्री भुसे यांनी यशवंतराव पाटील यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. येथे विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक डेअरी फार्मचे यावेळी त्यांनी विशेष कौतुक केले. विद्यापीठ कॅम्पसची पाहणी केल्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता उपस्थित होते.
फोटो ओळी : 1. तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ कॅम्पसमध्ये कृषिमंत्री दादा भुसे यांचे स्वागत करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व आमदार ऋतुराज पाटील. सोबत खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता आदी उपस्थित होते.