डी. वाय. पाटील कृषी, तंत्र विद्यापीठाचे गुरुवारी उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:15 AM2021-06-30T04:15:44+5:302021-06-30T04:15:44+5:30
कसबा बावडा : डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने तळसंदे येथे स्थापन करण्यात आलेल्या डी. वाय. पाटील कृषी ...
कसबा बावडा : डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने तळसंदे येथे स्थापन करण्यात आलेल्या डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते गुरुवारी, १ जुलै रोजी सकाळी १० वाजता व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे. माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित राहणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. यावेळी ग्रुपचे उपाध्यक्ष, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त, आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, कुलगुरू डॉ. के. प्रथापन उपस्थित होते.
चौकट :
प्रयोगशील व अनुभवात्मक शिक्षण
कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रातील हे नवे विद्यापीठ विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान न देता व्यवहारज्ञानातही पारंगत बनवण्याचा प्रयत्न करेल. बाजारपेठेची मागणी, व्याप्ती व संधी लक्षात घेऊन या ठिकाणी विविध अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्यक्ष क्लासरूममधील शिक्षणावर ५० टक्के भर दिला जाणार असल्याचे डॉ. संजय डी. पाटील यांनी सांगितले.
चौकट : संशोधन ठरेल शेतकऱ्याना वरदान
विद्यर्थ्यांच्या संशोधनवृत्तीला वाव मिळावा यासाठी काळाच्या गरजेनुसार विविध अभ्यासक्रम नव्या विद्यापीठात सुरू करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे विद्यापीठात होणारे संशोधन प. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास ग्रुपचे उपाध्यक्ष व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
चौकट : सर्वकष विकासावर भर
नव्या विद्यापीठामुळे विद्यार्थ्यामध्ये उच्च बौद्धिक क्षमता निर्माण करणे, सर्जनशील व उद्योगपूरक शिक्षण देणे शक्य होणार आहे. उच्च शिक्षण व संशोधनासाठी देश व विदेशातील संस्थांबरोबर सहकार्य, भागीदारी व सामंजस्य करार केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना करिअरच्या जास्तीत जास्त चांगल्या संधी मिळाव्यात यावर भर दिला जाणार असल्याचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.
चौकट : प्रवेश प्रक्रिया सुरू
नव्या विद्यापीठाकडून ४० हून अधिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेमध्ये कॉम्प्युटर सायन्स ॲड इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अॅँड इंजिनिअरिंग (आर्टिफिशियल इंजिनिअरिंग अॅँड मशिन लर्निंग), कॉम्प्युटर सायन्स ॲड इंजिनिअरिंग (डेटा सायन्स), फूड टेक्नोलॉजी, कृषी अभियांत्रिकी, बीसीए, एमसीए, वाणिज्य (कॉमर्स) शाखेतील बीकॉम/एमकॉम हॉनर्स, फायनान्स अॅँड अकाैंटिंग, इंटरनॅशनल फायनान्स, स्ट्रॅटेजिक फायनान्स, व्यवस्थापन (मॅनेजमेंट) शाखेत आॅनर्स, फायनान्स अॅँड अकाैंटिंग, इंटरनॅशनल फायनान्स, ट्रॅव्हल अॅँड टुरिझम मॅनेजमेन्ट, मार्केटिंग अॅँड सेल्स, अॅग्रो बिझनेस मॅनेजमेन्ट, डिजिटल मार्केटिंग, कला व मानव्यविद्या शाखेमध्ये बी. ए. (माध्यम आणि संप्रेषण), बी. ए. (अर्थशास्त्र), बी. ए. (पत्रकरिता), बी. ए. (लिबरल आर्टस), बी. ए. (मीडिया स्टडीज) आदी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.