डी. वाय. पाटील कारखाना बिनविरोध
By admin | Published: March 19, 2015 12:13 AM2015-03-19T00:13:33+5:302015-03-19T00:13:45+5:30
शेवटच्या दिवशी वैभववाडी गटातील सहाजणांनी माघार घेतल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना आहे.
कोल्हापूर : असळज (ता. गगनबावडा) येथील डॉ. डी. वाय. पाटील कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सलग तिसऱ्यांदा बिनविरोध झाली. बुधवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी वैभववाडी गटातील सहाजणांनी माघार घेतल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना आहे.
संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक जाहीर झाली होती. अन्य गटांतील निवडणूक अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवेळीच बिनविरोध झाली होती; पण वैभववाडी गटात तीन जागांसाठी नऊ अर्ज दाखल झाल्याने कारखान्याची निवडणूक लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष होते. आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील राजाराम कारखान्याची रणधुमाळी सुरू आहे. तिथे सतेज पाटील यांनी विरोधी पॅनेल उभा करून त्यांना आव्हान दिले आहे. सत्तारूढ गटातून त्यांच्याशिवाय संजय डी. पाटील हेदेखील संचालक मंडळात बिनविरोध निवडून आले आहेत.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार असे : गट क्रमांक १ : लोंघे (तीन जागा) बंडोपंत कोटकर, लहू पाटील, रवींद्र पाटील, गट क्रमांक २ : साळवण : बाजीराव पाटील, चंद्रकांत खानविलकर, खंडेराव घाटगे, गट क्रमांक ३ : मांडुकली : मानसिंग पाटील, तुकाराम पडवळ, अण्णासाहेब पडवळ, गट क्रमांक ४ : सैतवडे : संजय डी. पाटील, सतेज डी. पाटील, दत्तात्रय पाटणकर, गट क्रमांक ५ : वैभववाडी : गुलाबराव चव्हाण, प्रभाकर तावडे, जयसिंग ठाणेकर, संस्था गट : बजरंग पाटील, अनुसूचित जाती जमाती : शामराव हंकारे, महिला प्रतिनिधी : वैजयंती पाटील, वनमाला पाटील, इतर मागासवर्गीय : रामचंद्र बोभाटे, भटक्या विमुक्त जाती : बाजीराव शेळके.