डी. वाय. पाटील ग्रुप शेती क्षेत्रात क्रांती करणारी पिढी घडवेल : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 08:16 PM2021-07-01T20:16:57+5:302021-07-01T20:19:27+5:30
d y patil university Kolhapur : विज्ञानावर आधारीत शेती विकासाचा पाया रचणाऱ्या शाहू महाराजांमुळे कोल्हापूर राज्यात प्रगत झाले. आता त्याच कोल्हापुरात डी. वाय. पाटील ग्रुपचे खासगी क्षेत्रातील राज्यातील पहिले कृषी विद्यापीठ स्थापन झाले, याचा सार्थ अभिमान आहे, हे विद्यापीठ शेती क्षेत्रात क्रांती घडवणारी नवीन पिढी तयार करेल, असा विश्वास माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केला.
कोल्हापूर : विज्ञानावर आधारीत शेती विकासाचा पाया रचणाऱ्या शाहू महाराजांमुळे कोल्हापूर राज्यात प्रगत झाले. आता त्याच कोल्हापुरात डी. वाय. पाटील ग्रुपचे खासगी क्षेत्रातील राज्यातील पहिले कृषी विद्यापीठ स्थापन झाले, याचा सार्थ अभिमान आहे, हे विद्यापीठ शेती क्षेत्रात क्रांती घडवणारी नवीन पिढी तयार करेल, असा विश्वास माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केला.
तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे ऑनलाईन उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील होते. डी. वाय. ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री विश्वजित कदम व प्राजक्त तनपुरे, राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार ऋतुराज पाटील, राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर, खासदार संजय मंडलिक हे मान्यवर सोहळ्यास प्रत्यक्ष उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचे उद्घाटन, शैक्षणिक संकूल इमारत कोनशिला, मुक्त गोठा प्रकल्प, मुख्य प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाले. मान्यवरांचा सत्कार गायवासरू स्मृतिचिन्ह देऊन झाला.
राज्यातील हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनीच कोल्हापूरच्या मातीत विद्यापीठाचा शुभारंभ होण्याचा योग जुळून आला ही आनंददायी गोष्ट असल्याची भावना व्यक्त करून शरद पवार म्हणाले, शेवटच्या माणसापर्यंत बदल अनुभवायचा असल्यास शेतीचे अर्थकारण सुधारण्याशिवाय गत्यंतर नाही. शेतीवर अवलंबून असणाऱ्या ५८ टक्के लोकांची क्रयशक्ती सुधारली नाही तर देश संकटातून बाहेर येणार नाही, हे वास्तव आहे.
चीन, बँकॉक, नेदरलॅण्डसारख्या शेतीक्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या देशांशी समन्वय साधा, काही अडचण आली तर मला सांगा मी मदत करेन, अशी ग्वाही देखील दिली. राज्यातील राहूरी, परभणी, अकोला, दापोली येथील चारही सरकारी कृषी विद्यापीठाने आतापर्यंत महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान दिले आहे. आता एकत्रित विद्यापीठ ही संकल्पना घेऊन डी. वाय. पाटील ग्रुपने यात पाऊल ठेवले आहे, हे स्तुत्य आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करा. प्रास्ताविकात संजय डी. पाटील यांनी वाटचालीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन राहुल सोलापूरकर यांनी केले. आभार आमदार ऋतुराज पाटील यांनी मानले.