डी. वाय. पाटील हे राजयोगी
By admin | Published: February 15, 2016 01:03 AM2016-02-15T01:03:40+5:302016-02-15T01:08:23+5:30
सदानंद मोरे यांचे गौरवोद्गार : डी. वाय. पाटील ‘संत गाडगे महाराज समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर : संत गाडगे महाराज हे सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर कार्यरत राहिले. त्यांच्या शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील कार्याचे २१ व्या शतकात विस्तारीकरण करणारे डॉ. डी. वाय. पाटील हे आजच्या काळातील अध्यात्माच्या दृष्टीतून पाहता खरे राजयोगी आहेत, असे गौरवोद्गार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी येथे काढले.
येथील संत गाडगे महाराज अध्यासनातर्फे आयोजित संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनातील कार्यक्रमात बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना डॉ. मोरे यांच्या हस्ते ‘संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मानपत्र, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख प्रमुख उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, महात्मा फुले यांनी प्राथमिक शाळा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी हायस्कूल, महाविद्यालये सुरू केली. त्यांचे कार्य डॉ. डी. वाय. पाटील यांनी विद्यापीठ सुरू करून पुढे नेले. वसंतदादा यांनी दिलेली हाक आणि समाजाच्या शिक्षणाच्या गरजेवेळी ते पुढे आले आणि त्यांनी शिक्षण संस्था उभारून ज्ञाननिर्मितीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणात बदल करणे आवश्यक आहे.
देशमुख म्हणाले, राहणीमान नव्हे, तर जीवनाचा दर्जा उंचाविण्यासाठी जगा, समृद्धपणे जगा, भेदभाव टाळा, अशी शिकवण संतांनी दिली. ज्यांचा सहवास हवाहवासा वाटतो ते खऱ्या अर्थाने आताचे संत आहेत.
डॉ. शिंदे म्हणाले, माणसातील देव शिक्षणाच्या माध्यमातून शोधता येतो. या माध्यमातून डी. वाय. दादांनी माणसांचा शोध घेत ज्ञानसाम्राज्य उभे केले आहे. नवनवे शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करून त्यांनी समाजाला आदर्श घालून दिला आहे.
डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, परमेश्वर माणसामध्ये पाहायला शिका. आपण जे विचार पेरतो तेच उगवितात; त्यामुळे सकारात्मक विचार करा. आजचा हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे. कार्यक्रमास संत गाडगे महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता यादव, एम. डी. देसाई, श्याम कुरळे, आदी उपस्थित होते. ज्येष्ठ संगीतकार अरविंद पोवार यांनी गौरवगीत सादर केले. टी. आर. गुरव यांनी मानपत्राचे वाचन केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी स्वागत केले. अध्यासनाचे अध्यक्ष प्राचार्य रा. तु. भगत यांनी प्रास्ताविक केले.
संतांच्या पालखीची परंपरा
महाराष्ट्रात श्रीमंती, पद, प्रतिष्ठा मिळविलेल्यांच्यापेक्षा संतांची पालखी वाहण्याची परंपरा आहे. अशी परंपरा असलेले महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. त्यामुळे या संतांचे आपण वारसदार असून, त्यांच्या जीवनातील काही अंशाने तरी आपण जगले पाहिजे, असे आवाहन देशमुख यांनी केले.