डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये म्युकरमायकोसिसवर उपचार उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:34+5:302021-06-04T04:19:34+5:30
कसबा बावडा : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णामध्ये वाढ होत असून डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी स्वतंत्र कक्ष ...
कसबा बावडा : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णामध्ये वाढ होत असून डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत या ठिकाणी रुग्णावर उपचार उपलब्ध आहेत. या आजाराची कोणतीही लक्षणे दिसताच घाबरून न जाता तातडीने वैद्यकीय अधिकांचा सल्ला घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलच्या कान, नाक, घसा आजार विभागाच्या प्रमुख डॉ. राजश्री माने यांनी केले आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतर्गत म्युकरमायकोसिसवरील उपचारांसाठी शासनाने डी. वाय. पाटील हॉस्पिटलची निवड केली आहे. या हॉस्पिटलमध्ये म्युकरमायकोसिस उपचारांसाठी १५ बेडचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून सध्या तो फुल आहे. त्यामुळे नव्या रुग्णांना दाखल करून घेणे कठीण झाले आहे.
म्युकरमायकोसीस हे दुर्मिळ इन्फेक्शन असून त्याला काळी बुरशी असेही म्हटले जाते. कोविडमुळे कमी झालेली प्रतिकारशक्ती व कोविड उपचारानंतर वाढलेला अनियंत्रित मधुमेह यामुळे सध्या या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत.
योग्य वेळी दक्षता घेतली तर प्राथमिक अवस्थेत औषधाने बरा होतो. त्यामुळे कोणतीही लक्षणे जाणवल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन डॉ. माने यांनी केले आहे. त्याचबरोबर या विभागामध्ये एन्डोस्कोपी सर्जरीही दररोज सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या कान, नाक, घसा आजार विभागाचे डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. मोहिते, डॉ. वरुटे आणि डॉ. तारळेकर हे म्युकरमायकोसिसच्या रुग्णावर उपचार करत असून त्यांना डॉ. वाघ व डॉ. सबनीस यांची मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष गृह राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, वैद्यकीय अधीक्षीका डॉ. वैशाली गायकवाड यांचे यासाठी सहकार्य मिळत आहे.