‘विवेकानंद पॅटर्न’ निर्माण करणाऱ्या डी.ए. पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:19 AM2021-05-28T04:19:37+5:302021-05-28T04:19:37+5:30

प्राचार्य पाटील गेल्या दोन वर्षांपासून स्मृतिभ्रंश विकाराने त्रस्त होते. गेल्या आठवड्यापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यातच त्यांची गुरुवारी सायंकाळी ...

D.A. who created the ‘Vivekananda Pattern’. Patil passed away | ‘विवेकानंद पॅटर्न’ निर्माण करणाऱ्या डी.ए. पाटील यांचे निधन

‘विवेकानंद पॅटर्न’ निर्माण करणाऱ्या डी.ए. पाटील यांचे निधन

Next

प्राचार्य पाटील गेल्या दोन वर्षांपासून स्मृतिभ्रंश विकाराने त्रस्त होते. गेल्या आठवड्यापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यातच त्यांची गुरुवारी सायंकाळी माणगाव येथील निवासस्थानी प्राणज्योत मालवली. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्राचार्य पाटील यांना शिक्षणाची आवड होती. रांगडापणा, शिस्तबध्दता, कष्ट करण्याची तयारी ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्टे होती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. बापूजी साळुंखे यांचा त्यांना सहवास लाभला होता. बापूजींच्या मुशीत घडलेल्या प्राचार्य पाटील यांनी प्राचार्यपदावरून काम करताना संस्थेच्या वैभवात भर घालणारी कामगिरी केली. हिंदी विषयात एम.ए झाल्यानंतर माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीला सुरुवात केली. कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज हायस्कूल येथे सहायक शिक्षक म्हणून काम केले. पुढे ए.पी. मगदूम हायस्कूल माणगाव येथे मुख्याध्यापक झाले. तासगाव कॉलेजमध्ये प्राध्यापकपदी काम केले. तळमावले येथे प्राचार्यपदाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी त्यांनी ३० वर्षाहून अधिक काळ प्राचार्यपदी काम केले. करडी शिस्त, प्रशासनावर पकड, गुणवत्तेचा ध्यास आणि संस्थेचा विकास या चतुसूत्रीनुसार ते कार्यरत होते. प्राचार्यपदाची जबाबदारी पार पाडताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी रचनात्मक कार्य केले. ग्रंथालय, महाविद्यालयाच्या इमारती उभा केल्या. ठिकठिकाणी प्राचार्यपद उत्तमरित्या सांभाळल्यानंतर संस्थेने त्यांना कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी सोपविली. या महाविद्यालयाचा त्यांनी कायापालट करत राज्यात दबदबा निर्माण केला. विवेकानंद पॅटर्न निर्माण करत त्यांनी बारावी बोर्ड परीक्षेच्या गुणवत्ता यादीत महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकविले. बारावीच्या गुणवत्ता यादीत चमकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी निम्म्याहून अधिक विद्यार्थी हे विवेकानंद महाविद्यालयाचे असायचे. गुणी शिक्षकांना हेरुन त्यांच्याकडून उच्च दर्जाची कामगिरी करून घेण्याची त्यांची खासियत होती. शिक्षणक्षेत्राबरोबर ते शेतीही करत होते. त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग केले. शिक्षणक्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना राज्य सरकारने आदर्श शिक्षक पुरस्कार, इचलकंरजीतील फाय फाउंडेशन, दक्षिण भारत जैन सभेचा कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण सेवा पुरस्कारासह विविध संस्थांनी पुरस्कारांनी सन्मानित केले होते.

चौकट

कार्याचा गौरव

विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देत प्राचार्य पाटील यांनी महाविद्यालयाची गुणवत्ता वाढवली. बारावीसह त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीसह कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात महाविद्यालयाला अव्वलस्थानी ठेवले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून संस्थेने विवेकानंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला त्यांचे नाव दिले.

चौकट

ग्रामीण भागातील अनेकांना नोकरी दिली

३५ वर्षांच्या सेवेनंतर सन १९९६ मध्ये प्राचार्य पाटील हे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांना पुन्हा पाच वर्षे संस्थेने काम करण्याची संधी दिली. विवेकानंद महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर प्राचार्य पाटील यांनी डॉ. डी.वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य म्हणून सात वर्षे धुरा सांभाळली. विवेकानंद शिक्षण संस्थेत आजीव सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी ग्रामीण भागातील अनेकांना नोकरी दिली. माणगाव येथील एपीएम हायस्कूलचे ते संस्थापक होते. त्यांनी माणगाव येथील विवेकानंद शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये पत्नीच्या स्मरणार्थ सभागृह बांधून दिले.

Web Title: D.A. who created the ‘Vivekananda Pattern’. Patil passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.