बाबासाहेब नदाफ यांना दाभोलकर पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:20 AM2020-12-25T04:20:41+5:302020-12-25T04:20:41+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या पू. साने गुरुजी सार्वजनिक मोफत वाचनालयातर्फे देण्यात येणारा यंदाचा डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार ...
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या पू. साने गुरुजी सार्वजनिक मोफत वाचनालयातर्फे देण्यात येणारा यंदाचा डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार राष्ट्र सेवा दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बाबासाहेब शहानूरबी मेहबूब नदाफ (रा. हेरवाड, ता. शिरोळ) यांना, तर साने गुरुजी साहित्य पुरस्कार ‘रिंगाण’ या कादंबरीसाठी कृष्णात खोत (रा. फुलेवाडी, कोल्हापूर) यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी दिली.
नगराध्यक्षा कोरी यांनी पत्रकार परिषदेत या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा केली. साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार येथील काळू मास्तर विद्यालयाच्या पुष्पा ज्ञानदेव पाटील यांना देण्यात येणार आहे. याशिवाय भिकाजीराव मोहिते आदर्श वाचक पुरस्काराने व्यंकटेश काशिनाथ किणी (गिजवणे) व मंजूरअहमद बागवान (उत्तूर) यांना सन्मानित करण्यात येणार आहे. गेल्या ४१ वर्षांपासून वाचनालयातर्फे सात दिवसांची व्याख्यानमाला लोकशिक्षण व्याख्यानमाला चालविली जाते. परंतु, कोरोनामुळे यावर्षी एकच व्याख्यान घेतले जाणार आहे. त्याच दिवशी व्याख्यानापूर्वी पुरस्काराचे वितरण होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी वाचनालय सभापती शशीकला पाटील, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर उपस्थित होते.
------------------------
* बाबासाहेब नदाफ : २४१२२०२०-गड-०१
* कृष्णात खोत : २४१२२०२०-गड-०२
* पुष्पा पाटील : २४१२२०२०-गड-०३