दाभोळकर कॉर्नरजवळ गोळीबार-पेट्रोलपंप मालकास अटक; लघुशंका केल्याच्या कारणावरून घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:36 AM2018-06-08T01:36:53+5:302018-06-08T01:36:53+5:30
लघुशंका केल्याच्या कारणावरून येथील दाभोळकर कॉर्नर परिसरातील पेट्रोलपंप मालकाने एका प्रवाशाला धमकविण्यासाठी हवेत गोळीबार करण्याची घटना गुरूवारी रात्री
कोल्हापूर : लघुशंका केल्याच्या कारणावरून येथील दाभोळकर कॉर्नर परिसरातील पेट्रोलपंप मालकाने एका प्रवाशाला धमकविण्यासाठी हवेत गोळीबार करण्याची घटना गुरूवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे दाभोळकर कॉर्नर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी संशयित मुकुंद रामचंद्र यादव (वय ४७, रा. १५८८, बी वॉर्ड, जासूद गल्ली, मंगळवारपेठ, कोल्हापूर) याला शाहूपुरी पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली.
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दाभोळकर कॉर्नर परिसरातील पादचारी पुलाजवळ मुकुंद यादव याचा पेट्रोलपंप आहे. गुरुवारी रात्री पेट्रोलपंपानजीक एक प्रवासी लघुशंका करत होता. ते पाहून यादव याचा भाचा सुनिल तळवडे हा तेथे आला. त्याने या प्रवासाला हटकले. त्यातून दोघांची वादावादी सुरू झाली. थोड्या वेळातच याठिकाणी गर्दी जमली. ही गर्दी पाहून यादव हा पेट्रोलपंपाच्या केबिनमधून तेथे आला. यावेळी जमावातून सुनिल याला मारहाण झाली.
हा जमाव आपल्या अंगावर येणार आणि संबंधित प्रवाशाला धमकविण्यासाठी यादव याने स्वत:जवळील पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. यादवचा हा प्रकार पाहून जमावाची पळापळ झाली. त्यामुळे काहीकाळ येथे वातावरण तंग बनले. दरम्यान, हा प्रकार समजताच शाहुपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, लक्ष्मीपुरी पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी आला. पोलिस आल्याचे पाहताच जमाव पांगला. या प्रकरणी संशयित मुकुंद यादव याला शाहुपुरी पोलिस ठाण्यात पोलिसांनी आणले. त्याच्याकडे या प्रकरणाची कसून चौकशी सुरू होती. त्यासह संबंधित प्रवाशाकडून या घटनेची माहिती घेण्याचे पोलिसांचे काम सुरू होते.
दोन पुंगळ्या सापडल्या
घटनास्थळी पोलिसांना दोन पुंगळ्या सापडल्या. त्यांनी या पुंगळ्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी यादव याच्यावर खुनाचा प्रयत्न, भारतीय हत्यार कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.