दाभोलकर, पानसरेंप्रमाणे माझाही खून होईल!
By admin | Published: April 15, 2016 12:23 AM2016-04-15T00:23:41+5:302016-04-15T00:29:21+5:30
तृप्ती देसाई यांची भीती
कोल्हापूर : अंबाबाई देवीच्या मंदिरात बुधवारी माझ्यावर झालेला हल्ला हा हिंदुत्ववादी संघटनांनी रचलेला माझ्या हत्येचा कट होता. सीसीटीव्ही फुटेज पाहून हल्लेखोरांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत; अन्यथा माझाही दाभोलकर, पानसरे यांच्याप्रमाणे खून होईल, अशी भीती भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.
पोलिसांना संपूर्ण स्थिती माहीत असूनही त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अन्यथा मंत्रालयात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
अंबाबाईच्या मंदिरातील गाभारा प्रवेशावेळी बुधवारी रात्री देसाई यांना काही महिलांनी मारहाण केली. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर गुरुवारी दुपारी पुण्याकडे उपचारासाठी दाखल केले होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर गुरुवारी दुपारी पुण्याकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येत असल्याची पूर्वकल्पना पोलीस, प्रशासनाला दिली होती. तरीही पोलिसांनी १४४ कलम लावून माझ्यासोबतच्या काही महिलांना ताब्यात घेतले. मंदिरात मला विरोध करणारे बघितल्यानंतर १४४ कलम केवळ भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यानाच लागू होते का? असा प्रश्न निर्माण होतो. मंदिरात पोलिसांसमक्ष माझ्यावर हल्ला झाला. माझा गळा दाबला, कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला. राज्य व केंद्रात आमचे सरकार असल्याचे संबंधित संघटनांकडून बोलले जाते. त्याचा प्रत्यय मला बुधवारी आला.
हाजी अलीबाबत बैठक
आता त्र्यंबकेश्वर, शबरीमाला आणि मुुंबईतील हाजी अली दर्ग्यातील प्रवेशासाठी आंदोलन केले जाणार आहे. हाजी अली दर्ग्यातील प्रवेशाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यावर राज्य सरकारने म्हणणे मांडले आहे. येथील प्रवेशाच्या मुद्द्याबाबत काही मुस्लीम महिला संघटनांचे प्रतिनिधी मला भेटले आहेत. त्यांची बैठक घेऊन आंदोलनाची रणनीती ठरविणार असल्याचे देसाई म्हणाले.
तृप्ती देसाई यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करुन अहवाल जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांना सादर केला जाईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पत्रकारांना सांगितले.