दाभोलकर-पानसरे खुन्यांचे ‘सीबीआय’ने दुवे शोधावेत,सनातन संस्थेबंदीबाबत निर्णय घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:16 AM2018-04-05T00:16:59+5:302018-04-05T00:18:24+5:30
कोल्हापूर : कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपींचे सनातन संस्थेशी संबंध होते, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर : कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपींचे सनातन संस्थेशी संबंध होते, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या खुनांमागेही याच विचारांच्या शक्ती आहेत. त्यामुळे सीबीआय व महाराष्ट्र पोलिसांनी आता कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून अधिक दुवे शोधून काढावेत, अशी मागणी डॉ. हमीद दाभोलकर व मेघा पानसरे यांनी बुधवारी निवेदनाद्वारे केली.
गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी के. टी. नवीनकुमार हा सनातन संस्था व तिच्याशी संलग्न हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता असून, त्या संघटनेच्या बैठकांना तो हजर राहिल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. दाभोलकर, पानसरे व एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनांनंतरही आम्ही याच शक्तींचा हत्येमागे हात व मेंदू असल्याचा संशय सातत्याने व्यक्त करीत आलो; परंतु त्या दृष्टीने जेवढ्या गांभीर्याने तपास व्हायला हवा होता तेवढा झाला नाही. त्यामुळे आता तरी सीबीआय व महाराष्ट्र पोलिसांनी मिळालेल्या या महत्त्वाच्या दुव्याचा उपयोग करून मारेकरी शोधून काढावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचे या दोघांनी स्वागत केले आहे.२०१५ मध्ये केंद्र सरकारने या संस्थेच्या गुन्ह्याविषयी नव्याने माहिती मागविली असून सरकारने ती ९ नोव्हेंबर २०१५ पाठविल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत आता तातडीने निर्णय घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.