दाभोलकर हत्याप्रकरणी राज्यव्यापी बैठका घेणार
By admin | Published: September 15, 2014 12:38 AM2014-09-15T00:38:56+5:302014-09-15T00:51:11+5:30
दुहेरी शोधमोहीम : श्रमिक मुक्ती दलाच्या बैठकीत निर्णय
कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अद्याप पोलिसांना लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर समुदाय सहभाग व लाँगमार्च अशा दोन्ही मार्गांनी शोधमोहीम राबविण्यासाठी अस्थायी निमंत्रक समिती नियुक्त करून २८ सप्टेंबरला राज्यव्यापी बैठक कोल्हापुरात आयोजित करण्याचा निर्णय आज, रविवारी श्रमिक मुक्ती दलाच्या बैठकीत घेण्यात आला.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला एक वर्षे उलटून गेले. त्यांचे खुनी कोण आहेत हे सत्ताधाऱ्यांना शोधून काढायचे नाही. पोलीस आणि सीबीआय हे फक्त शोधाचे नाटक करत आहेत. खुनी आणि त्यांच्या सूत्रधारांना शोधून काढून त्यांना जनतेच्या न्यायालयात खेचून आणण्याचे कार्य आता जनतेनेच केले पाहिजे. जनतेच्या समुदायाने खुनी शोधून काढण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने शाहू स्मारक येथे आज बैठक घेण्यात आली. यावेळी दुहेरी शोधमोहीम सुरू करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यासाठी अस्थायी निमंत्रक समितीची नियुक्ती करून कोल्हापुरात राज्यव्यापी बैठक आयोजित करण्याचा निर्णय झाला. या समितीमध्ये डॉ. भारत पाटणकर, अनिल म्हमाने, गणेश भिसे, डॉ. ज. रा. दाभोळे, रमेश वडणगेकर, डी. के. बोडके, अमोल महापुरे, अजित घोंडगे, प्रकाश शिंदे, श्रीपाल कांबळे, आकाराम झोरे, संतोष गोटल आदींचा समावेश करण्यात आला. बैठकीत कॉ. रघुनाथ कांबळे, कॉ. सतीशचंद्र कांबळे, अॅड. पंडितराव सडोलीकर, कृष्णा पाटील, संदीप संकपाळ आदींनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)