शिक्षक मतदारसंघासाठी दादा लाड, खंडेराव जगदाळे यांच्यासह सहाजणांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 12:07 PM2020-11-13T12:07:16+5:302020-11-13T12:09:50+5:30
puneteachers, eleaction, kolhapurnews पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी गुरुवारी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक दादा लाड, राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, टीचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्निक्सकडून (टॅफनॅप) प्रा. नितीन पाटील यांच्यासह सहाजणांनी उमेदवारी अर्ज भरले.
कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी गुरुवारी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक दादा लाड, राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, टीचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्निक्सकडून (टॅफनॅप) प्रा. नितीन पाटील यांच्यासह सहाजणांनी उमेदवारी अर्ज भरले.
यातील शिक्षकांच्या आग्रहाखातर आणि शिक्षणक्षेत्रातील अडचणी, विविध प्रश्न सोडविण्यासाठी मी निवडणूक लढवित आहे. मात्र, कोल्हापूरचा आमदार होण्यासाठी अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी येथील उमेदवारांमध्ये एकमत होऊन एकच उमेदवार ठेवण्याचा निर्णय व्हावा, अशी माझी इच्छा असल्याचे दादा लाड यांनी सांगितले. यावेळी कोजिमाशिचे अध्यक्ष कैलास सुतार, संचालक बाळ डेळेकर, आदी उपस्थित होते.
शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असल्याचे खंडेराव जगदाळे यांनी सांगितले. यावेळी तात्यासाहेब मस्कर, सुनील कल्याणी, प्रकाश पाटील, आदी उपस्थित होते. प्रा. नितीन पाटील यांचा अर्ज दाखल करताना प्रा. सचिन शिंदे, अर्पिता काळे, सुहास पाटील, आदी उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे सहकार्यवाह प्रा. सुभाष जाधव, इचलकरंजीतील माजी मुख्याध्यापक संभाजीराव खोचरे, प्रा. तानाजी नाईक यांनीही अर्ज दाखल केले आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाकडून ॲड. संतोष कमाने यांनी अर्ज दाखल केला. दरम्यान, अर्ज दाखल करताना उमेदवारांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले.