दादा लाड यांना पोलिसांनीच केले बेअब्रू, व्हिडीओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 03:31 PM2020-03-31T15:31:35+5:302020-03-31T15:41:34+5:30
बघा, हे स्वत: शिक्षक आणि पत्रकार असूनही संचारबंदी मोडून असे फिरत आहेत अशी टिप्पणी पोलिस अधिका-यांने त्या व्हिडीओमध्ये केली आहे.
कोल्हापूर : स्वत: पेशाने शिक्षक, सवडीने पत्रकार असलेले व कोल्हापूरातील माध्यमिक शिक्षकांची महत्वाची संस्था असलेल्या कोजिमाशी संस्थेच्या सत्तारुढ गटाचे नेते दादा लाड व त्यांचे मित्र राजेश पाटील यांना मंगळवारी संचारबंदीच्या काळात येथील मेरी वेदर ग्राऊंडवर मॉर्निंग वॉक करताना पोलिसांनी पकडले. त्यांचा व्हिडीओ करून तो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने त्यांची चांगलीच बेअब्रु झाली. बघा, हे स्वत: शिक्षक आणि पत्रकार असूनही संचारबंदी मोडून असे फिरत आहेत अशी टिप्पणी पोलिस अधिका-यांने त्या व्हिडीओमध्ये केली आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधानांनी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. या काळात लोकांनी घरीच बसावे असे आवाहन प्रशासन वारंवार करत आहे. परंतू कांही अतिउत्साही लोक अजूनही ते मानायला तयार नाहीत. मॉर्निंग वॉकला गेले तर काय होतंय अशी त्यांची उलट विचारणा असते. अशा लोकांच्याबाबतीत गांधीगिरी करण्याची मोहिम सुरु करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत.
त्यानुसार लाड व त्यांच्यासोबत असलेले त्यांचे शिक्षक मित्र राजेश पाटील यांना पोलिसांनी फिरून घामाघुम आल्यावर अडविले. त्यांना नांव विचारल्यावर लाड हे खिशातील एका वृत्तपत्राचे ओळखपत्र दाखवून मी पत्रकार आहे असा रुबाब मारत होते. परंतू पोलिसांनी बघा, शिक्षक व पत्रकार असूनही हे संचारबंदीचे पालन करत नसल्याची टिप्पणी करून त्यांना चांगलाच टोला लगावला. लाड हे शिक्षक मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेलक्या टिप्पण्यासह दिवसभर फिरत राहिला.