महामंडळांतील नियुक्तीत ‘दादां’ची आघाडी
By admin | Published: January 28, 2016 12:50 AM2016-01-28T00:50:30+5:302016-01-28T01:04:31+5:30
कार्यकर्त्यांची वर्णी : सहकार, वस्त्रोद्योग अंतर्गत चार नियुक्त्यांमध्ये कोल्हापूरने मारली बाजी
राजाराम लोंढे -- कोल्हापूर --राज्य सरकारच्या विविध महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये सहकार, वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी आपल्या खात्यांतर्गत येणाऱ्या चार महामंडळांवर पक्षातील कार्यकर्त्यांची वर्णी लावली आहे. उर्वरित बहुतांश मंत्र्यांनी आपल्या खात्यांतर्गत महामंडळांच्या नियुक्त्या केल्या नसून, पक्षाचे कार्यकर्ते गेले सव्वा वर्ष लाल दिव्याच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यमंत्र्याचा दर्जा असलेली काही महामंडळे कार्यरत आहेत. प्रत्येक खात्यांतर्गत स्वतंत्र कार्यभार असलेल्या या महामंडळांना विशेष महत्त्व आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळू न शकलेल्या व दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना खूश करण्यासाठी महामंडळाचे गाजर असते. राज्यात भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर येऊन सव्वा वर्ष झाले; पण मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्याचबरोबर महामंडळांच्या नियुक्त्याही केलेल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही पक्षांसह मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, ‘रिपाइं’, ‘रासप’ यांच्या कार्यकर्त्यांत कमालीची नाराजी आहे. महिना-दीड महिन्याने महामंडळांच्या नियुक्त्यांची नुसती टूम उठविली जात असल्याने कार्यकर्ते पुन्हा ताजेतवाने होतात. महामंडळांच्या अध्यक्षपदाची निवड करताना संबंधित खात्याचे कॅबिनेट मंत्री फाईल तयार करून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने निवडी जाहीर करतात. सहकार व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी चार महामंडळांच्या अध्यक्षांच्या निवडी केल्या आहेत. सहकार परिषद महामंडळ व लेखापरीक्षण महामंडळ सहकार खात्यांतर्गत येते. येथे अनुक्रमे शेखर चरेगावकर (कऱ्हाड) व सचिन पटवर्धन (पिंपरी-चिंचवड) यांची नियुक्ती केली. वस्त्रोद्योग खात्यांतर्गत वस्त्रोद्योग महामंडळ व यंत्रमाग महामंडळाचा समावेश होतो. यामध्ये अनुक्रमे युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर यांची व हिंदुराव शेळके यांची नियुक्ती केली आहे.
महामंडळांच्या अध्यक्ष नियुक्तीत कोल्हापूरला किमान दोन पदे मिळणार हे निश्चित आहे. त्यातील हिंदुराव शेळके यांची वर्णी लागली आहे. भाजपचे महानगरचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांची ‘म्हाडा’च्या अध्यक्षपदी नियुक्ती निश्चित मानली जात आहे. खुद्द चंद्रकांतदादा पाटील यांनी जाधव यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्याचे सूतोवाच केले होते. ‘म्हाडा’ महामंडळ हे सर्वसामान्य माणसाशी निगडित असणारे महामंडळ आहे; त्यामुळे या महामंडळाच्या अध्यक्षाला चांगले ग्लॅमर आहे. म्हणून सर्वांच्याच उड्या या महामंडळाच्या अध्यक्षपदावर पडतात. महसुली नऊ विभागांप्रमाणे ‘म्हाडा’चे महामंडळ कार्यरत आहेत. पुणे विभागाच्या महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी महेश जाधव यांचे नाव आघाडीवर आहे; पण ‘म्हाडा’ हे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे या निवडीला गती येत नसली तरी मंत्री चंद्रकांतदादांनी या नियुक्त्या करून आघाडी घेतली. उर्वरित महामंडळ नियुक्त्या फेबु्रवारीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात होतील, असे सूत्रांकडून समजते.
वाटणीचा गुंता मिटेना!
महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन सव्वा वर्ष झाले तरी महामंडळ वाटपाचा गुंता सुटलेला नाही. कोणती महामंडळे शिवसेनेला द्यायची याबाबत काहीच चर्चा झालेली नाही. त्यातच मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष महामंडळांच्या नियुक्तीसह मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फारसे उत्सुक दिसत नसल्याने नियुक्त्या लांबणीवर पडल्या आहेत.