'महसूल'ची दादागिरी अमान्य

By admin | Published: February 10, 2016 12:53 AM2016-02-10T00:53:32+5:302016-02-10T00:55:02+5:30

हसन मुश्रीफ : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कागलमध्ये भीक मांगो आंदोलन

Dadaagiri Invalid 'Revenue' | 'महसूल'ची दादागिरी अमान्य

'महसूल'ची दादागिरी अमान्य

Next

कागल : राज्यातील भाजप सरकार वेगवेगळ्या करांची व दंड आकारणी करून समाजातील कष्टकरी घटकांना आर्थिक त्रास देत पैसे गोळा करीत आहे. या शासनाला भीक लागल्याने ते गोरगरिबांच्या सेवासुविधा एकीकडे बंद करीत आहे, तर दुसरीकडे ठरवून पैसे वसुली करीत आहे, याचा निषेध करण्यासाठी आम्ही भीक मांगो आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेद्वारे सामान्य लोकांवर सुरू केलेली दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनाची वसुलीची ही दादागिरी मुळासकट उपटून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस कागल तालुक्याच्यावतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले. गैबी चौकातून बसस्थानकमार्गे मोर्चाने भीक मागत आंदोलक येथील तहसील कार्यालयासमोर आले. याप्रसंगी मुश्रीफ बोलत होते. भीक मागून आणलेल्या रकमेची खोकी नायब तहसीलदार सरस्वती पाटील व शिवाजीराव गवळी यांच्याकडे दिली. दरम्यान, मंगळवारी या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा देत कागलमध्ये व्यापाऱ्यांनीही कडकडीत बंद पाळला.
मुश्रीफ म्हणाले, गेली दोन महिने भाजप शासन आर्थिक आघाडीवर डळमळत आहे. निराधार, अंगणवाडी सेविका, इतर घटकांबरोबरच नोकरांचे पगार वेळेवर देऊ शकत नसल्याने महसूल विभागामार्फत टार्गेट देऊन पैसे गोळा केले जात आहेत. कागल तालुक्याला पाच कोटींचे उद्दिष्ट आहे. यासाठी महसूल कर्मचारी यांच्याकडून वाळू, दगड, खडी काढणारे, बांधकाम करणारे यांना रात्री-अपरात्री
पकडून दंड वसूल केला जात आहे. अकृषक कराच्या नावाखाली व्यापाऱ्यांवरही दंड आकारला जात आहे. म्हणून कागल बंद ठेवून हे आंदोलन केले. हा प्रकार त्वरित थांबावा; अन्यथा जनतेत उद्रेक होईल, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, जिल्हा लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, प्रकाश गाडेकर, शिवानंद माळी, संजय हेगडे यांची भाषणे झाली.
आंदोलनात नगराध्यक्ष संगीता गाडेकर, प्रदीप पाटील-भुयेकर, बळवंतराव माने, प्रवीण भोसले, विकास पाटील, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)


कागल बंदला प्रतिसाद
व्यापारी वर्गाला अकृषक कराची आकारणी सुरू केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी पुकारण्यात आलेल्या कागल बंदला उत्स्फू र्त प्रतिसाद लाभला. सकाळपासून दुकाने उघडली नाहीत. मात्र एस.टी., शाळा, महाविद्यालये, दवाखाने सुरू होते.


चाकांची हवा सोडा
पोलिसांनी नोटीस देऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी तर प्रांत, तहसीलदार यांच्यावर वसुलीसाठी दबाव आणत आहेत. यापुढे जर कारवाईसाठी असे पथक आले तर त्यांच्या गाडीच्या चाकांची हवा सोडून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करा. मारहाण, शिवीगाळ करू नका, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

Web Title: Dadaagiri Invalid 'Revenue'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.