दादागिरी केल्यास पायताणाने हाणल्याशिवाय सोडणार नाही; भाजप उमेदवार सत्यजित कदमांचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 11:30 AM2022-04-02T11:30:55+5:302022-04-02T11:31:24+5:30
गेल्या निवडणुकीत यांनी हिंदुत्ववादी विचाराचा पराभव करून शिवसेना संपविली ही जनता व शिवसैनिक विसरलेले नाहीत.
कोल्हापूर : मी बोलणारा नव्हे, तर काम करून दाखविणारा कार्यकर्ता आहे. परंतु, ‘कोल्हापूर उत्तर’च्या निवडणुकीत आमच्या सभेला, प्रचाराला आलेल्या लोकांना फोन करून दादागिरी करणे सुरू आहे. असा प्रयत्न पुन्हा झाल्यास पायताणाने हाणल्याशिवाय मी सोडणार नाही, असे वक्तव्य भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी गुरुवारी शिवाजी पेठेतील सभेत केले. त्याचा व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाल्यावर त्याबद्दल समाजातून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. कोल्हापूरची ही राजकीय संस्कृती नाही असे सांगतानाच ही निवडणूक कोणत्या थराला जाईल, अशी भीतीही लोकांनी व्यक्त केली.
भाजपचे राज्य प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचे प्रकरण ताजे असतानाच कदम यांच्या वक्तव्याची त्यात भर पडली. शहराच्या विकासाचा अजेंडा, राजकीय टीकाटिप्पणी करण्यापेक्षा अरेतुरेची भाषा, शिवीगाळ, अश्लाघ्य भाषेतील टीका सुरू असल्याने या निवडणुकीस वेगळेच वळण लावले जात आहे. सामाजिक ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न पद्धतशीर सुरू आहेत.
या सभेत बोलताना उमेदवार सत्यजित कदम म्हणाले, कालच कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बैठक होऊन त्यांनी मला बिनशर्त पाठिंबा दिला. कोल्हापूर हे हिंदुत्ववादी विचारांचेच शहर असल्याचे प्रत्त्यंतर यापूर्वी आले आहे. आतापर्यंत फक्त दोनवेळा काँग्रेसचा विजय झाला आहे. सलग तीस वर्षे हिंदुत्ववादी विचाराचा उमेदवार निवडून आला आहे.
गेल्या निवडणुकीत यांनी हिंदुत्ववादी विचाराचा पराभव करून शिवसेना संपविली ही जनता व शिवसैनिक विसरलेले नाहीत. मी केव्हा जास्त आक्रमक बोलत नाही; परंतु आता बोलावे लागत आहे. आमच्या प्रचाराला, सभेला गेला म्हणून दादागिरी केल्यास मी त्याला पायताणाने हाणल्याशिवाय सोडणार नाही. मला निवडून दिल्यास केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहराचे सर्व प्रश्न सोडवीन असे कदम यांनी सांगितले.
उमेदवार कदम यांच्याआधी भाषणे केलेल्या प्रा. जयंत पाटील व सुनील कदम यांनीही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. मी महापौर असताना हा तिसऱ्या फळीत उभा होता, त्याच्या सगळ्या कुंडल्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असे सुनील कदम यांनी सांगितले.
बावडेकरांचे पाप
विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत मालोजीराजे यांना पाडण्याचे पाप बावडेकरांनी केल्याची टीका सत्यजित कदम यांनी केली.