फासेपारध्याच्या अर्जुनला लाभले दातृत्व
By admin | Published: December 1, 2015 12:39 AM2015-12-01T00:39:35+5:302015-12-01T00:42:23+5:30
प्रशासनातील माणुसकी : 'आत्मा'च्या प्रकल्प उपसंचालक भाग्यश्री फरांदे यांनी स्वीकारले पालकत्व -- गुड न्यूज
आनंद पाटील - कोल्हापूर --शितं असली की माणसं भुतासारखी जमणाऱ्या या दुनियेत आभाळ हरवलेल्यांचे सोबती आणि वाट चुकलेल्यांचे सारथी होणारे तसे दुर्मीळच. हे खरं असलं तरी माणुसकी जपणारी माणसं आजही समाजात आढळतात, पण प्रशासकीय सेवेत ती मोठ्या अभावानंच पहायला मिळतात. कोल्हापूरच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) प्रकल्पाच्या उपसंचालक भाग्यश्री पवार-फरांदे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्थेतील आदिवासी पारधी समाजातील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या अर्जुन उदास्या भोसले याचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.
शिकलेल्यांनी नाकारल्यामुळे एकविसाव्या शतकातही पारध्यांची फरफट होत असली तरी याच समाजातील संवेदनशील माणसांच्या दातृत्वामुळे फासेपारध्यांसह अनेक उपेक्षितांची जीवनबाग फुलली आहे. फरांदे कुटुंबीय मुळचे आणेवाडी (ता. जि. सातारा) येथील रहिवासी आहेत. महामानव बाबा आमटे सेवा संस्थेच्या कार्याची बातमी वाचून फरांदे कुटुंबीयांनी आपला मुलगा शाहू याचा वाढदिवस या संस्थेत साजरा करण्याचे निश्चित केले. या संस्थेचे संस्थापक अनंत झेंडे यांच्या सामाजिक कार्याचा हेवा वाटला म्हणूनच फरांदे यांनी थेट श्रीगोंदा गाठले. या संस्थेतील आदिवासी फासेपारधी व अनाथ, भटक्या मुलांशी संवाद साधल्यानंतर शेकडो मैलांचा प्रवास करून गेलेल्या फरांदे कुटुंबीयांचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला.
कोल्हापूरहून जाताना फरांदे यांनी गाडीतून धान्य, कपडे, पुस्तके आणि मिठाई नेली होती. मात्र, या चिमुकल्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांचे हृदय भरून आले आणि त्यांनी ज्यांचे जन्म मातीत मळले आहेत अशांना त्यांनी उचलून घेण्याचा निर्णय घेतला. इयत्ता चौथीत सेमी इंग्रजीत शिकणाऱ्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या आदिवासी पारधी ह्यसत्तुऱ्याह्णचा अर्जुन झालेल्या मुलाचे शैक्षणिक पालकत्व त्यांनी स्वीकारले.
पुढारलेल्या समाजव्यवस्थेनं नाकारलेल्या आणि जन्मताच चोर-दरोडेखोराचा शिक्का असलेल्या आदिवासी फासेपारधी समाजातील मुलांना बाबा आमटे विकास सेवा संस्था वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न करीत आहे. या संस्थेच्या कार्याला आणि उपेक्षितांच्या पंखात बळ भरणाऱ्या विशेषत: प्रशासकीय सेवेतील माणुसकीला आपण खरं तर सलामच ठोकायला हवा!
बाबा आमटे विकास सेवा संस्थेत सध्या आदिवासी पारधीसह विविध समाजातील ४२ उपेक्षित मुले आश्रयास आहेत. यापैकी ३२ मुले एक ते दहा वयोगटातील आहेत. या मुलांचा शैक्षणिक, निवास तसेच आरोग्यासाठी संस्था खर्च करते. एक कुटुंब म्हणूनच आम्ही सर्व या मुलांची काळजी घेतो. समाजातील दानशूर व्यक्तीच्या पाठबळावरच या उपेक्षित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरू आहे.
- महेश पाटील, खजिनदार, बाबा आमटे विकास सेवा संस्था, श्रीगोंदा
चोर-दरोडेखोर हा शिक्का आदिवासी फासेपारधी समाजातील मुलांना पुसून टाकायचा आहे. मात्र, त्यासाठी त्यांच्या पाठीवर स्नेहाचा हात ठेवून ह्यलढह्ण म्हणणारं कुणी तरी हवं आहे म्हणूनच आम्ही अर्जुन भोसले याचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं आहे.
- भाग्यश्री पवार-फरांदे,
प्रकल्प उपसंचालक, आत्मा, कोल्हापूर
मला 'आयपीएस' व्हायचंय : अर्जुन
मी या संस्थेतून पळून गेलो होतो. मात्र, सरांनी मला विश्वास दिला. त्यामुळे मी आता मनापासून अभ्यास करीत आहे. मला खूप शिकून 'आयपीएस' व्हायचंय, असं अर्जुन भोसले याने सांगितले.