सहकार शुद्धिकरणाची ‘दादा’गिरी थंडावणार
By admin | Published: July 18, 2016 01:02 AM2016-07-18T01:02:09+5:302016-07-18T01:10:13+5:30
चंद्रकांतदादांना बढती : सहकारसम्राटांनी सोडला नि:श्वास; चौकशीच्या फेऱ्यातून सुटका?
राजाराम लोंढे / कोल्हापूर
चंद्रकांतदादा पाटील यांना महसूलमंत्रिपदी बढती मिळाल्याने सहकारातील दिग्गजांनी काहीसा नि:श्वास सोडला आहे. पावणेदोन वर्षे मंत्री पाटील यांनी सहकारातील स्वाहाकाराला लगाम लावत चौकशीचा ससेमिरा मागे लावल्याने संस्थाचालक मेटाकुटीला आले होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख हे स्वत: सहकार नेते असल्याने दादांच्या ताकदीने काम करण्यावर त्यांच्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळात मंत्र्यांचा कोणत्या क्षेत्राचा अभ्यास अधिक आहे, त्याची आवक पाहूनच खाते वाटप केले जाते. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील या दिग्गजांचीच सहकारमंत्री म्हणून वर्णी लागली. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिगर संस्थाचालकच राज्याचा सहकारमंत्री असेल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. दादांनी गेली पावणेदोन वर्षे सहकार शुद्धिकरणाची मोहीम हाती घेतली होती. पहिल्यांदा त्यांनी संपूर्ण राज्यातील संस्थांचे सर्वेक्षण करून बोगस संस्था बंद करण्याचे आदेश दिले. केवळ मतांसाठी काढलेल्या संस्था अवसायनात काढून सहकारसम्राटांना दादांनी पहिला हादरा दिला. ज्या बँकांच्या संचालक मंडळावर रिझर्व्ह बॅँकेने कारवाई केली, त्या संचालकांना पुन्हा निवडणूक लढविता येणार नाही, असा वटहुकूम काढला. यामुळे दोन्ही काँग्रेसचे दिग्गज नेते चांगलेच अडचणीत आले आहेत. राज्य बँकेच्या माध्यमातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, हसन मुश्रीफ, लक्ष्मण पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची पदे धोक्यात आली आहेत. वटहुकुमाला विधानपरिषदेत मान्यता मिळाली नसल्याने दादांनी नव्याने वटहुकूम काढला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असले तरी कारवाईची तलवार सहकारसम्राटांच्या डोक्यावर कायम आहे.
‘एफआरपी’चा प्रश्नही चाणाक्षपणे हाताळून कारखानदारांना ‘एफआरपी’ देणे भाग पाडले. ज्यांनी दिली नाही त्यांच्यावर थेट परवाना रद्दची कारवाई पहिल्यांदाच झाल्याने साखर उद्योग हादरून गेला. अनेक सहकारी संस्थांची चौकशी लावून दादांनी आपल्या कामकाजाची दिशा स्पष्ट केली होती. दादांना थोपविण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला, पण ते निष्पभ्र ठरले. आतापर्यंत एवढ्या ताकदीने सहकार खात्यात दादांनीच काम केल्याचे सहकारातील तज्ज्ञ खासगीत बोलत आहेत.
नवीन सहकारमंत्री सोलापूरचे सुभाष देशमुख यांची ‘लोकमंगल’ संस्थेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात ओळख आहे. सहकारातील नेत्यांवरच ही जबाबदारी दिल्याने दादांनी राबविलेली शुद्धिकरणाची मोहीम त्या ताकदीने पुढे जाईल, असे जाणकारांना वाटत नाही.
प्रभावी कामाचे बक्षीस !
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पावणेदोन वर्षांचा लेखाजोखा मांडताना सर्वांत प्रभावी असे काम सहकार खात्यात झाल्याचे नमूद करावे लागेल. दादा पक्षाध्यक्ष ‘अमित शहा यांचे निकटवर्ती’ म्हणून महसूल खाते मिळाल्याची कितीही चर्चा सुरू असली तरी दादांनी सहकार विभागात केलेल्या आक्रमक कामांची दखल घेऊनच मुख्यमंत्र्यांनी दादांना बढती दिल्याची चर्चा सहकार विभागात सुरू आहे.