‘नगरोत्थान’च्या रखडलेल्या रस्त्याचा ‘डाग’

By Admin | Published: January 8, 2015 11:31 PM2015-01-08T23:31:00+5:302015-01-09T00:26:01+5:30

मालती अपार्टमेंट ते एनसीसी भवन रस्त्याचा प्रश्न : पायाभूत सुविधा, पाणी, कचरा उठावाचा प्रश्न निकालात

'Dag' of the narrow road of 'Nagorothan' | ‘नगरोत्थान’च्या रखडलेल्या रस्त्याचा ‘डाग’

‘नगरोत्थान’च्या रखडलेल्या रस्त्याचा ‘डाग’

googlenewsNext

संतोष मिठारी -कोल्हापूर -गटर्स, अंतर्गत रस्ते, वेळेवर कचरा उठाव, नियमित पाणी, अशा पायाभूत सुविधा भक्कम असलेल्या शिवाजी विद्यापीठ प्रभागाला नगरोत्थानमधील एका रखडलेल्या रस्त्याचा ‘डाग’ लागला आहे. प्रभागातील ड्रेनेजलाईनची जोडणी पूर्ण झाली आहे. संबंधित ड्रेनेजलाईन महापालिकेच्या प्रमुख लाईनला जोडायची की, चेंबर्सद्वारे जोडणी पूर्ण करायची याचा महापालिका प्रशासनाकडील स्पष्टीकरणाअभावी त्याचे पुढील काम थांबले आहे.
उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीधारक अशा संमिश्र स्वरूपातील मतदार या प्रभागात आहेत. त्यात शाहू नाक्याजवळील वैभव सोसायटी, ग्रीन पार्क, रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजी विद्यापीठ, राम मंगल कार्यालय, सम्राटनगर, नलवडे कॉलनी, अश्विनीनगर, जागृतीनगरचा त्रिकोणी भाग, डवरी वसाहत, पाथरवट वसाहत, अंबाई डिफेन्स् कॉलनी अशा परिसराचा समावेश आहे. क्षेत्रफळाच्यादृष्टीने शहरातील सर्वांत मोठा असणाऱ्या प्रभागात मतदारांची संख्या मात्र, कमी आहे. गेल्या निवडणुकीत याठिकाणी साडेपाच ते सहा हजार मतदारांची नोंद झाली आहे. या प्रभागाचे प्रतिनिधित्व नगरसेविका दीपाली ढोणुक्षे करत आहेत.
आकारमानाने प्रभाग मोठा असूनही पायाभूत सुविधा मात्र, नगरसेविका ढोणुक्षे यांनी भक्कमपणे केल्या आहेत. घंटागाडी तसेच महापालिकेच्या वाहनांद्वारे प्रभागातील कचरा उठाव वेळेवर केला जातो. शिवाय ठिकठिकाणी कचराकुंड्याही ठेवण्यात आल्या आहेत. प्रमुख रस्ते, चौकांतील महापालिका कर्मचाऱ्यांनी नियमितपणे स्वच्छता केली जाते. पथदिव्यांची संख्या साधारणत: ११० पर्यंत आहे. त्यातील ९९ टक्के पथदिवे सुरू आहेत. प्रभागातील ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई आर्वजून केली जाते. काही तांत्रिक अडचणींमुळे पाण्याचा प्रश्न होता. पण, त्यांची पूर्तता केल्याने सध्या पाणी नियमित आणि प्रेशरने मिळते.
जागृतीनगर, पायमल वसाहत आणि अंबाई डिफेन्स कॉलनीजवळील एकूण दोनशे कुटुंबांचा गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रॉपर्टीकार्डचा प्रश्न निकालात काढण्यात आला आहे. प्रभागात ढोणुक्षे यांचा संपर्क चांगला असल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रभागाचे शेवटचे टोक असलेल्या वैभव सोसायटी, ग्रीन पार्क, समता कॉलनीमधील पाणी, अंतर्गत रस्ते, पथदिवे अशा पायाभूत सुविधांचा प्रश्न निकालात निघाला आहे. पायाभूत सुविधांनी भक्कम असलेल्या प्रभागाला नगरोत्थानमधील एका रखडलेल्या मालती अपार्टमेंट ते एनसीसी भवनपर्यंतच्या रस्त्याचा डाग लागला आहे. डांबरीकरणाच्या अंतिम थराचे (फायनल लेअर) काम प्रलंबित राहिले आहे. प्रभागांतर्गत जोडणी पूर्ण झालेल्या ड्रेनेज लाईनबाबत महापालिकेच्या स्पष्टीकरणाअभावी पुढील काम ठप्प झाले आहे. त्यामुळे या लाईनमधील उघडे असलेले चेंबर्स धोकादायक ठरत आहेत. पायमल वसाहतींतील एका अंतर्गत रस्त्याचे काम झालेले नाही. या प्रलंबित कामांची पूर्तता लवकर व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

प्रभागातील ९० टक्के कामे मार्गी लावली आहेत. उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य, गरीब नागरिकांच्या वसाहती प्रभागात आहेत. त्यांचा समतोल विकास साधला आहे. नगरोत्थानमधील एक रस्ता, पायमल वसाहत, सम्राटनगर परिसरातील काही अंतर्गत रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. त्यांची वर्क आॅर्डर झाली असून, ती कामे लवकरच पूर्ण केली जातील.
- दीपाली ढोणुक्षे (नगरसेविका)

Web Title: 'Dag' of the narrow road of 'Nagorothan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.