'एक पहाट पन्हाळगडावर, ‘कोल्हापूर हायकर्स’चा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 07:08 PM2017-10-18T19:08:15+5:302017-10-18T19:13:02+5:30
अपरिचित गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगचे आयोजन करणाºया ‘कोल्हापूर हायकर्स’ या ग्रुपच्या वतीने मंगळवारी (दि. १७) पहाटे ‘एक पहाट पन्हाळगडावर’ या उपक्रमांतर्गत दीपोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. या दीपोत्सवाने संपूर्ण गडपरिसर उजळून निघाला होता.
पन्हाळा , दि. १८ : अपरिचित गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगचे आयोजन करणाºया ‘कोल्हापूर हायकर्स’ या ग्रुपच्या वतीने मंगळवारी (दि. १७) पहाटे ‘एक पहाट पन्हाळगडावर’ या उपक्रमांतर्गत दीपोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. या दीपोत्सवाने संपूर्ण गडपरिसर उजळून निघाला होता.
बदलत्या काळात आजच्या तरुणाईला इतिहासाचे भान व्हावे आणि किल्ल्यांचे महत्त्व प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचावे यासाठी हा ग्रुप नेहमी प्रयत्नशील असतो. प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम साजरे करण्यात ‘कोल्हापूर हायकर्स’चे सदस्य पुढे असतात.
ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला, त्याच महाराजांनी घडविलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात, ही बाब लक्षात घेऊन या वर्षी मंगळवारी धनत्रयोदशीदिवशी पहाटे पन्हाळगडावर दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रतिवर्षी या दीपोत्सवाचे स्वरूप व्यापक होत आहे.
दीपोत्सवाची सुरुवात शिवमंदिरापासून झाली. यावेळी डॉ. अमर आडके यांनी उपस्थित शिवप्रेमींना पन्हाळगडाचा इतिहास सांगितला. पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रूपाली रवींद्र धडेल, उपनगराध्यक्ष हारुणशेठ नूरमहंमद मुजावर, पन्हाळ्याचे तहसीलदार राम चोबे, पन्हाळ्याचे नायब तहसीलदार अनंत गुरव, पन्हाळ्याचे प्रशासकीय वनाधिकारी प्रशांत तेंडुलकर, हॉटेल मालक संघटनेचे सचिन शानबाग यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीचे पूजन होऊन दीपोत्सवास प्रारंभ झाला. या ठिकाणी श्रीमंत योगी मर्दानी आखाडा, कोल्हापूर यांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली.