‘पाच’गावात पाण्यासाठी ‘दाही’दिशा

By admin | Published: December 17, 2015 12:19 AM2015-12-17T00:19:52+5:302015-12-17T01:22:21+5:30

नियोजनाचा अभाव : पाचगावातील ६५ वसाहतींत टॅँकरने पाणीपुरवठा; टंचाईला कंटाळल्याने अनेकांचे स्थलांतर

'Dahi' direction for water in five 'Ganga' | ‘पाच’गावात पाण्यासाठी ‘दाही’दिशा

‘पाच’गावात पाण्यासाठी ‘दाही’दिशा

Next

कोल्हापूर : शहरालगत असलेल्या पाचगावचे ग्रामस्थ तहानेने व्याकुळ झाले आहेत. गावातील लहान-मोठ्या अशा एकूण ६५ वसाहतींत सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीप्रश्न गंभीर झाल्याने ग्रामस्थांना, विशेषत: महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ऐपत असणारे विकत घेऊन पाणी पीत आहेत. पाणीप्रश्नाला कंटाळून काहीजण इथली घरे विकून जात आहेत. स्थलांतरणाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी टंचाईग्रस्त कॉलनीत बंगला, फ्लॅट विकणे आहे,
भाड्याने देणे आहे, असे फलक दिसत आहेत.
या गावाची लोकसंख्या सुमारे तीस हजार आहे. शहराच्या हद्दीला लागूनच गाव असल्यामुळे विस्तार झपाट्याने वाढतो आहे. प्रामुख्याने मूळ गाव आणि पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत वसाहती वाढल्या आहेत. गेल्या वीस वर्षांपासून मूळ गावातील सहा हजार लोकांना विंधन विहिरीद्वारे पाणीपुरवठा होतो. चार दिवसांपूर्वी विंधन विहिरीची पाणीपातळी खाली गेल्याने ती बंद आहे. त्यामुळे तेथील बाळासाहेब मोरे (वाडकर) या खासगी शेतकऱ्यांनी नागरिकांना स्वत:हून पिण्यासाठी पाणी दिले आहे. त्यामुळे मुख्य
गावात तीन ते चार दिवसांतून पाणी येत आहे.
पश्चिम भागातील ६५ वसाहतींमध्ये शिंगणापूर योजनेतून महानगरपालिका पाणी देत होती; पण कळंबा तलावातून राष्ट्रीय पेयजलाची योजना झाल्यानंतर महापालिकेने सन २००८ पासून पाचगावाला पाणी देणे बंद केले आणि ‘पेयजल’च्या योजनेतून पाणीपुरवठा सुरू होता. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने यंदा नोव्हेंबर महिन्यात कळंबा तलावाने तळ गाठला. पेयजलाच्या योजनेद्वारेच केला जाणारा पाणी उपसा बंद केला आहे. त्यामुळे पश्चिम भागातील मराठा कॉलनी, पोवार कॉलनी, शिवनेरी कॉलनी, साईनाथ पार्क, नवजीवन कॉलनी, मगदूम कॉलनी, विठ्ठल-रखुमाई कॉलनी, शांतीनगर कॉलनी, रेणुकानगर, महालक्ष्मी पार्क, कोणार्क पार्क, म्हाडा कॉलनी, वटवृक्ष कॉलनी, झेंडा चौक, प्रगतीनगर, शिक्षक कॉलनी, भोगम कॉलनी अशा लहान-मोठ्या ६५ वसाहतींमध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. या वसाहतींना पाणी देणारी हक्काची एकही योजना सध्या कार्यान्वित नाही. त्यामुळे टँकरवर अवलंबून राहावे लागते आहे. टँकर चौकात आल्यानंतर पाण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. लहान मुलांसह महिला घागर घेऊन पाणी भरण्यासाठी धावत येत आहेत, तर नोकरीनिमित्त सकाळपासून बाहेर असणाऱ्यांचे हाल होत आहेत.
महापालिकेच्या शिंगणापूर पाणी योजनेतून सुभाषनगर पंप हाऊसमधून पाचगावच्या पूर्व भागात पाणीपुरवठा केला जातो. यामुळे तेथील वीर सावरकरनगर, हरी पार्क, मातंग वसाहत, हरिजन वसाहत, दत्तनगर, तारा कॉलनी, गुलमोहर कॉलनी, शांतादुर्गा कॉलनी, देसाईनगर, द्वारकानगर, राधाकृष्ण कॉलनी, आपटे मळा या भागांत तीन ते चार दिवसांआड पाणी मिळत आहे. मात्र हेही पाणी अनियमित व कमी दाबाने मिळत आहे. या भागालाही पाणीटंचाईची झळ पोहोचत आहे. गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी पाचगावसह सर्वच वसाहतींत पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. (प्रतिनिधी)


आमदार, खासदार कुठे आहेत ?
आमदार अमल महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांना निवडून आणण्यात पाचगावच्या मतदारांचा महत्त्वाचा वाटा आहे. गावात पाणीप्रश्न भीषण झाला आहे. पाणीटंचाईला कंटाळून अनेकजण घरे सोडून आणि विकून जात आहेत. जिल्हा परिषदेच्या सदस्या मनीषा वास्कर, आमदार अमल महाडिक हे टँकरने पाणीपुरवठा करून दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण आमदार, खासदार कायमचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी शासकीय पातळीवर वजन का वापरत नाहीत? ते कोठे आहेत? असे सवाल अनेक ग्रामस्थांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीजवळ उपस्थित केले.

सन २००४ पासून टंचाई
पाचगावातील पाणीटंचाई सन २००४ पासून भासते. मे आणि जूनचा अर्धा महिना ती प्रकर्षाने जाणवत होती; परंतु यंदा कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने न भरल्याने डिसेंबरपासूनच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. प्रत्येक निवडणुकीतील प्रचारात पाणीप्रश्नाचा मुख्य मुद्दा होतो. निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेले नेते पाणीप्रश्नाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात, असा पाचगावकरांचा अनुभव आहे.

योजनेचे काम कासवगतीने...
पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे सहा कोटी रुपयांच्या पाणीयोजनेचे काम सुरू आहे; पण निधीअभावी ते कासवगतीने सुरू आहे. अपेक्षित गतीने निधी मिळत नसल्यामुळे या उन्हाळ्यात तरी या योजनेद्वारे पाचगावकरांची तहान भागणार का, असा प्र्रश्न निर्माण झाला आहे.


दहा लाख लिटर पाणी आवश्यक
संपूर्ण पाचगावातील ग्रामस्थांची गरज भागण्यासाठी रोज आठ ते दहा लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. आता टँकरच्या माध्यमातून रोज केवळ ४० हजार लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. यावरून अनेक कुटुंबांत पाणी पोहोचविण्यात यंत्रणा यशस्वी झालेली नाही, हे स्पष्ट होते. आमच्या गल्लीत, घरासमोरच टँकर उभा करावा, यासाठी वशिला लावला जात आहे.

पाचगावचा पाणीप्रश्न भीषण झाला आहे. ६५ वसाहतींत सध्या टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या योजनेला शासनाने त्वरित निधी द्यावा.
- भिकाजी गाडगीळ,
शहाजी पाटील, सदस्य, ग्रामपंचायत

बांधकामे ठप्प
पाणी नसल्यामुळे उपनगरांतील अनेक बांधकामे रखडली आहेत. आर्थिक कुवत असलेले लोक पाचशे रुपये प्रतिटँकरप्रमाणे पाणी विकत घेऊन बांधकाम करीत आहेत. टँकरने अवेळी पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे घरातील एक माणूस केवळ पाणी आणण्यासाठीच राहावा लागत आहे. गावातील प्रत्येकाच्या घरासमोर पाणीसाठ्यासाठी टाकी ठेवल्याचे दिसत आहे.

Web Title: 'Dahi' direction for water in five 'Ganga'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.