दहीहंडीच्या थरारावर यंदा विरजण

By Admin | Published: August 23, 2016 12:18 AM2016-08-23T00:18:26+5:302016-08-23T00:33:14+5:30

२0 फुटांची मर्यादा : युवा शक्तीची दहीहंडी रद्द; बक्षिसांची रक्कम गोविंदा मंडळांत वाटणार

Dahihandi thunderstorms this year | दहीहंडीच्या थरारावर यंदा विरजण

दहीहंडीच्या थरारावर यंदा विरजण

googlenewsNext

कोल्हापूर : दहीहंडीला स्पर्श करता-करता गोविंदा खाली कोसळतो, बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो... आणि खाली पडलेल्या गोविंदाला गंभीर दुखापत होते, असे चित्र गेली काही वर्षे गोकुळाष्टमीच्या सणामध्ये अवघ्या महाराष्ट्राला पाहण्यास मिळत असे. मात्र, उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेत २० फुटांपेक्षा जादा उंचीच्या दहीहंडीला परवानगी न देण्याची सूचनाच जारी केली. त्यामुळे यंदा गुरुवारी (दि. २५) होणारी ‘दहीहंडी’ चार थरांचीच होणार आहे.
गेले काही वर्षे राजकारण आणि मंडळामंडळांतील ईर्ष्येमुळे दिवसेंदिवस दहीहंडीची उंची वाढत होती. त्यातून लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या आमिषांमुळे जिल्ह्यात अनेक गोविंदा पथके तयार झाली. या गोविंदा पथकांची तयारीही गोकुळाष्टमीच्या सहा-सहा महिने अगोदर सुरू असे. मात्र, यंदा उच्च न्यायालयाने केवळ दहीहंडीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांवरून पडणाऱ्यांच्या संख्येची व त्यातून जखमी होऊन पुढे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या लक्षात घेतली. त्यानुसार यंदा तरी २० फुटांपेक्षा अधिक उंचीची दहीहंडी मंडळांना उभारता येणार नाही, असे आदेश दिले आहे. या याचिकेतील पुढील सुनावणी आॅक्टोबरमध्ये होणार आहे.
बक्षिसांच्या रकमेवर परिणाम
मोठ्या मानवी थरांना पोलिस प्रशासन परवानगी देणार नसल्याने चुरस कमी होणार हे सर्वश्रुत झाले आहे. त्यामुळे यंदा दहीहंडी उत्सव साजऱ्या करणाऱ्या काही मंडळांनी बक्षिसांची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हीच रक्कम गणेशोत्सवात वापरण्यात येईल, असे सांगितले जात आहे.


पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी ‘युवाशक्ती’ची दहीहंडी यंदा रद्द करण्यात आली आहे; कारण दहीहंडी हा थरारक खेळ आहे. ५० फुटांवरील थरार केवळ २० फुटांवर आणण्याचा निर्णय झाल्याने या खेळातील चुरस संपली आहे. दरवर्षी या उत्सवात सहभागी होण्यासाठी मुले सहा महिने अगोदर सराव करतात. या निर्णयामुळे त्यांची मेहनत वाया जाणार आहे. त्यामुळे यावर्षी दहीहंडी न करण्याचा निर्णय घेतला आहे. बक्षिसाची रक्कम सर्व गोविंदा मंडळांमध्ये समान वाटप केली जाईल.
- खासदार धनंजय महाडिक

न्यायालयाने थरांची अट लावल्याने यंदा दहीहंडीची चुरसच कमी झाली आहे. त्यामुळे जे मंडळ प्रथम येईल त्या मंडळास दहीहंडी फोडण्याचा मान देऊ. विशेषत: वीस फुटांपेक्षा जादा उंचीची दहीहंडी उभी केली जाणार नाही. यंदा तर पाच संघांनाच आम्ही निमंत्रण दिले आहे.
- किरण नकाते, नगरसेवक
संयोजक, गुजरी कॉर्नर मित्र मंडळ


उच्च न्यायालयाच्या अटीनुसारच मंडळांना दहीहंडी साजरी करावी लागणार आहे. त्यामुळे कोल्हापुरातील दहीहंडी साजरी करणाऱ्या मोठ्या मंडळांना १४९ नुसार नोटीस पाठवून दिल्या आहेत. त्यात न्यायालयाचे आदेश मंडळांनी जर पाळले नाहीत, तर सर्वच सदस्यांवर गुन्हे नोंद केले जातील. त्यामुळे मंडळांनी न्यायालयाच्या अटी व शर्तींचे पालन करून उत्सव साजरा करावा.
- भारतकुमार राणे,
शहर पोलिस उपअधीक्षक

Web Title: Dahihandi thunderstorms this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.