महिन्याभरात कोल्हापुरातून रोज विमानसेवा : धनंजय महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 06:45 PM2018-06-07T18:45:58+5:302018-06-07T18:45:58+5:30
सध्या तीनच दिवस सुरू असणारी विमानसेवा आठवडाभर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून येत्या महिनाभरात रोज सकाळी ७.३० वाजता मुंबईसाठी विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती
कोल्हापूर : सध्या तीनच दिवस सुरू असणारी विमानसेवा आठवडाभर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून येत्या महिनाभरात रोज सकाळी ७.३० वाजता मुंबईसाठी विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना महाडिक म्हणाले, की सध्या नाशिकसाठी जो वेळेचा स्लॉट आहे तो कोल्हापूरसाठी घेण्याचा प्रयत्न आहे. हे शक्य झाले तर एअर डेक्कनचे हे विमान सकाळी मुंबईला जाईल आणि संध्याकाळी ६.३० ला मुक्कामाला कोल्हापुरात येईल. कोल्हापूर आणि परिसरातील नागरिक, उद्योजक, व्यावसायिक यांना ही सेवा अतिशय उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.
नव्या विमानसेवांबाबत माहिती देताना ते म्हणाले, इंडिगो ७४ आसन क्षमतेचे विमान हैदराबाद, तिरुपती मार्गावर सुरू करणार असून त्यादृष्टीने त्यांची तयारीही पूर्ण झाली आहे. त्यांनी आवश्यक कर्मचारी भरती करण्यासाठी मुलाखतीही घेतल्या आहेत. एअर अलायन्स कंपनी बंगलोर सेवा करण्यासाठी उत्सुक असून ७२ आसन क्षमतेचे विमान सुरू करण्याची त्यांची तयारी आहे. १५ आॅगस्टपर्यंत त्यांचा परवाना असल्याने तोपर्यंत याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.
या सर्व फेऱ्या सुरू होतील, असे गृहीत धरून विमानतळावरील प्रतीक्षालयाची क्षमता वाढविणे, तिकीट कौंटर वाढवणे ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत, असे महाडिक यांनी सांगितले. कोल्हापूर विमानतळाबाबत जी सल्लागार समिती नेमण्यात आली आहे. तिची पहिली बैठक आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजता उजळाईवाडी विमातळावर घेण्यात येणार आहे.