महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘डेअरी एक्स्पो’, कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार - चेतन नरके
By राजाराम लोंढे | Published: December 3, 2022 07:07 PM2022-12-03T19:07:53+5:302022-12-03T19:08:21+5:30
एकाच छताखाली मिळणार माहिती
कोल्हापूर : इंडियन डेअरी असोसिएशन आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या वतीने कोल्हापुरात २० ते २२ जानेवारी २०२३ अखेर शाहूपुरी जिमखाना मैदानात ‘डेअरी एक्स्पो’चे आयोजन केले आहे. महाराष्ट्रासह तीन राज्यातील सहकारी व खासगी दूध संघाचा सहभाग राहणार असून ‘डेन्मार्क’, ’थायलंड’ येथील दूध व्यवसायातील तंत्रज्ञानाची माहिती येथील शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी दिली.
डॉ. नरके म्हणाले, महाराष्ट्रातील दूध व्यवसाय विस्कळीत झाल्याने दहा वर्षांनंतर येथील दूध व्यवसाय संकटात येणार असून त्यादृष्टीने आपण पाऊले टाकणे गरजेचे आहे. तरुण पिढीला या व्यवसायात आणून दुसरी धवलक्रांती करण्याचे काम करावे लागेल. शेतकऱ्यांच्या गोठ्यात आहे त्या पशुधनाचे दूध वाढवत असतानाच नवीन जातीची दुभती जनावरे शेतकऱ्यांच्या गोठ्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. जोपर्यंत दूध व्यवसायात व्यावसायिकता येणार नाही तोपर्यंत क्रांती होणार नाही, दूध व्यवसायाशी संबंधित सर्वच घटकांना मोठे होण्याची संधी या ‘एक्स्पो’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.
‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके, ‘चितळे’चे गिरीश चितळे, ‘वारणा’चे अनिल हेरलेकर, ‘भारत डेअरी’चे किरीट मेहता, ‘थोरात डेअरी’चे आबासाहेब थोरात, ‘विराज’ डेअरीचे विशाल पाटील, ‘गोविंद डेअरी’चे संजीवराजे निंबाळकर, ‘राजारामबापू’चे नेताजीराव पाटील, ‘कुटवळ’ डेअरीचे प्रकाश कुटवळ, ‘थोपटे डेअरी’चे नितीन थोपटे, ‘समाधान डेअरी’चे राहुल थोरात आदी उपस्थित होते.
दिल्ली, गुजरातनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच
अशा प्रकारचे एक्स्पो दिल्ली, गुजरातमध्ये अनेक वेळा आयोजित केले जातात; मात्र महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे. येथील शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास डॉ. नरके यांनी व्यक्त केला.
विखे, अजित पवार उदघाटक
‘एक्स्पो’चे उद्घाटन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आदींच्या हस्ते होणार आहे.
एकाच छताखाली ही मिळणार माहिती
जास्तीत जास्त व गुणवत्ता पूर्ण दूध उत्पादन वाढीसाठी काय करावे
संकलनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर मार्गदर्शन
पशुखाद्य, लसीकरणासह पशूंचे संगोपन
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती
दुभती जनावरे, दुधाच्या मशिनरी, चारा अनुदान
डेन्मार्क, थायलंड आदी देशातील मार्गदर्शनपर स्टॉल