दाजीपूर गवा अभयारण्याची पर्यटकांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:26 AM2021-01-19T04:26:54+5:302021-01-19T04:26:54+5:30
दुर्गमानवाड : राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागातील दाजीपूर गवा अभयारण्य पर्यटकांना आकर्षित करून भुरळ घालणारे स्थळ म्हणून प्रसिद्ध होत ...
दुर्गमानवाड : राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागातील दाजीपूर गवा अभयारण्य पर्यटकांना आकर्षित करून भुरळ घालणारे स्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहे. हे पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी खुले झाले असून स्थानिक पातळीवरील कमिटी व वन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
वन्यजीव विभाग व स्थानिक विकास समिती यांच्यावतीने येथे पर्यटकांच्या निवासाची सोय केली आहे. अडीच महिन्यात ३५९६ पर्यटकांनी येथे हजेरी लावली आहे. पर्यटकांना राहण्यासाठी सुसज्ज तंबू उभारण्यात आले असून जंगल परिसराची सफर करण्यासाठी स्वतंत्र वाहनांची सोय केली आहे. आतापर्यंत १ लाख ४४ हजारांचे उत्पन्न झाले आहे. पर्यटकांना त्यातून सोयी उपलब्ध केल्यामुळे त्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. या अभयारण्याची युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळात नोंद असून गवा अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. या अभयारण्यात शाहुकालीन शिवगड, डुरडा बांबर टाॅवर, लक्ष्मी पाॅईंट, महादेव मळी, होळोचा सडा, वाघाचे पाणी, सांबर कुंड, सापळा पाॅईंट, सावराई सडा, वाघुळ गुहा, गिधाडाचे पाणी आदी पाॅईंट प्रेक्षणीय आहेत.
पर्यटकांसाठी माहिती केंद्र व ऑडिटरी हाॅलचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. जंगल फिरतीसाठी सकाळी सहा ते दुपारी अडीचपर्यंत वेळ दिलेला असून जंगलात गवा, सांबर, भेकर, साळींदर, शेखरू, गेळा, अस्वल, रानकोंबडा, रानकुत्रा अशा विविध जातींचे प्राणी व पक्षी पाहावयास मिळत असल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत येथील वनक्षेत्रपाल एन. बी. पाटील, मुख्य वन्यजीव संरक्षक समाधान चव्हाण, विभागीय वनाधिकारी विशाल माळी, स्थानिक विकास समिती अध्यक्ष विलास पाटील व सरपंच सुभाष पाटील, तसेच इतरांचे पर्यटकांना मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
फोटो कोलडेस्कवर आहेत