दाजीपूरच्या पर्यटन निवास केंद्राचे काम दोन वर्षे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:23 AM2021-04-08T04:23:45+5:302021-04-08T04:23:45+5:30
राधानगरी : पर्यटन व्यवसाय वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या दाजीपूर (ता. राधानगरी) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटन निवास केंद्राच्या ...
राधानगरी : पर्यटन व्यवसाय वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या दाजीपूर (ता. राधानगरी) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटन निवास केंद्राच्या कामाचा खेळखंडोबा सुरू आहे. साडेचार कोटींच्या या प्रकल्पावर अडीच कोटी रुपये खर्ची पडले आहेत. ७५ टक्के काम झाले आहे. मात्र दोन वर्षापासून काम बंद पडले आहे. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी व ठेकेदार यांच्यात समन्वय नसल्याने हे काम पुढे सरकू शकलेले नाही. तांत्रिक अडचणी व थकीत देयके यावरून अधिकारी व ठेकेदार एकमेकाकडे बोट दाखवत आहेत.
अनेक वैशिष्ट्ये असलेले हे राज्यातील सर्वात जुने अभयारण्य आहे. पर्यटन, संशोधन व अभ्यास यासाठी येथे देश-विदेशातून लोक येतात. पर्यटन महामंडळाने पंचवीस वर्षांपूर्वी निवास केंद्र सुरू केले होते. ते जुने झाल्याने येथे आधुनिक सोयी-सुविधांयुक्त नवीन हॉलिडे रिसॉर्टची योजना २०१३-१४ मध्ये आखण्यात आली. २०१५-१८ मध्ये त्याचे काम सुरू झाले. निवासी इमारत, भोजन कक्ष यासाठी भव्य स्वरूपाच्या दोन स्वतंत्र इमारती बांधून पूर्ण झाल्या आहेत. दरवाजे-खिडक्या,फरशी,प्लंबिंग,विद्युतीकरण व रंगरंगोटी अशी कामे अपुरी आहेत. मात्र दोन वर्षापासून हे काम जैसे थे या स्थितीत आहे. उपयोगात येत नसल्याने या काळात मिळू शकणारे उत्पन्न बुडाले, शिवाय दरवाढीमुळे खर्चात मोठी वाढ होणार आहे.
चौकट :
१० डिसेंबर रोजी अभयारण्यातील पर्यटन विकास आराखड्याबाबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक झाली होती. आमदार प्रकाश आबिटकर यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्यांनी यातील अडचणी तत्काळ दूर करून काम पूर्ण करून घेण्याचे आदेश संबंधितांना दिले होते. मात्र त्यांच्या आदेशालाही यंत्रणेने केराची टोपली दाखविली आहे.
कोट :
काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठेकेदाराच्या अडचणीसाठी त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करायची आहे. यासाठी आयोजित केलेली बैठक त्यांच्यामुळेच एकदा रद्द झाली. पुन्हा अशी बैठक घेऊन अडचणी सोडविण्याचा व काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- विनय बावधने, कार्यकारी अभियंता, पर्यटन महामंडळ.
कोट :
या कामात सुरुवातीपासून अनेक तांत्रिक अडचणी आहेत. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना वारंवार याची माहिती देऊनही त्या सोडविण्यासाठी काहीही मदत होत नाही. झालेल्या कामाचे पैसेही पूर्ण मिळालेले नाहीत. केवळ पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे हे काम रखडले आहे.
- सुजित गायकवाड, ठेकेदार, सोलापूर.
फोटो : ०७ दाजीपूर पर्यटन केंद्र
ओळ-
महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या दाजीपूर येथील पर्यटन निवास केंद्राच्या इमारतींचे काम दोन वर्षांपासून अशा अर्धवट अवस्थेत बंद पडले आहे.