कोल्हापूर: नृसिंहवाडीत उतरता दक्षिणद्वार सोहळा, मंदिरातील पाणी होऊ लागले कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 12:19 PM2022-08-20T12:19:03+5:302022-08-20T12:27:52+5:30
दक्षिणद्वार सोहळ्यात स्नान करणे योगायोग
प्रशांत कोडणीकर
नृसिंहवाडी : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे काल, शुक्रवारी दुपारी एक वाजता चालू सालातील दुसरा उतरता दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्रावण महिना असल्याने नृसिंहवाडी परिसरातील अनेक भाविकांनी दक्षिणद्वार सोहण्याचा लाभ घेतला.
पावसाने उसंत घेतल्याने व धरणातून होणारा विसर्ग कमी झाल्याने गेले काही दिवसांपासून येथील कृष्णा व पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत होती. नदीची पाणीपातळी कमी झाल्याने आज दुपारी एक वाजता चालू सालातील उतरता दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला आज रात्री उशिरापर्यंत मंदिरातील पाणी कमी होऊन मंदिर दर्शनासाठी सुरू होण्याची शक्यता आहे.
दक्षिणद्वार सोहळ्यात स्नान करणे योगायोग
येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिणेकडे वाहते. पावसाळ्यात नदीचे पाणी वाढलेने मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णानदीचे पाणी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून श्रींच्या पादुकांना स्पर्श करीत मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते. यालाच दक्षिणद्वार सोहळा असे म्हटले जाते. दक्षिणद्वार सोहळा नदीची पाणी पातळी वाढणे, अगर कमी होणे यावर अवलंबून असतो. त्यामुळे दक्षिणद्वार सोहळ्यात स्नान होणे हा योगायोगच असतो.
मागील आठवड्यात पावसाच्या संततधारेमुळे कोयना, राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. यामुळे श्री दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. सद्या पावसाने उसंत घेतली असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत घट होत आहे.