दलित अत्याचारप्रश्नी विधिमंडळावर धडक
By Admin | Published: May 13, 2014 12:47 AM2014-05-13T00:47:46+5:302014-05-13T00:47:46+5:30
रामदास आठवले : वाढते अत्याचार हा महाराष्ट्राला कलंक
कोल्हापूर : पुरोगामी विचाराच्या राज्यात दलितांवरील अत्याचार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना गृहमंत्री अत्याचार कमी झाल्याचा डांगोरा पिटत दिशाभूल करत आहेत. दलितांवरील वाढते अत्याचार हा महाराष्टÑाला लागलेला कलंक असल्याची खंत ‘रिपाइं’(आठवले गट)चे राष्टÑीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी ‘रिपाइं’ युवक आघाडीच्या वतीने २ जूनला विधिमंडळावर धडक देण्यात येणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. दलित अत्याचारविरोधी शांतता समितीची स्थापना करावी, अशी मागणी करत राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला ३५ ते ३६ जागांवर निश्चित यश मिळणार असून, केंद्रात ‘एनडीए’चे सरकार स्थापन होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आज (सोमवार) ‘रिपाइं’च्या चिंतन शिबिरासाठी कोल्हापुरात आले असता खा. आठवले बोलत होते. आठवले म्हणाले, राज्यात २०१३ मध्ये दलितांवर १६३३ ठिकाणी अत्याचार झाले, तरीही गेल्यावर्षीपेक्षा अत्याचार कमी झाल्याचा दावा गृहमंत्री आर. आर. पाटील करत आहेत. अत्याचारांच्या संख्येपेक्षा ते होऊ नयेत, यासाठी राज्य शासनाने काय केले? सर्वच गावे व मराठा समाज दोषी नाही. मूठभर जातीयवादी विष पेरण्याचे काम करतात. येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांची भेट घेऊन अत्याचार वाढत असल्याचे पुरावे देणार आहे. अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक गावात दलित अत्याचारविरोधी शांतता समिती स्थापना केली पाहिजे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक व स्वतंत्र यंत्रणा द्यावी. जेणेकरून अशा घटना स्थानिक पातळीवरच मिटवण्यात यश येऊ शकेल. रामदेवबाबांनी दलितांबद्दल वापरलेली भाषा चुकीची होती, पण त्यांना दलितांचा अपमान करायचा नव्हता. त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे. तरीही विविध ठिकाणी त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी. दलित नेत्यांच्या एकीकरणासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. इतर गट महायुतीत आले तर त्यांचे स्वागतच करू, असेही आठवले यांनी सांगितले. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात आपणाला निश्चित स्थान मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रा. शहाजी कांबळे, गौतम भालेराव, उत्तम कांबळे, पी. के. जैन, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)