दलित वस्तीप्रश्नी महामार्ग रोखला

By admin | Published: May 8, 2016 12:29 AM2016-05-08T00:29:29+5:302016-05-08T00:29:29+5:30

उदगावमध्ये आंदोलन : तहसीलदार, ग्रामपंचायत पदाधिकारी धारेवर; कोल्हापूर-सांगली महामार्ग ठप्प

The Dalit Vasti Prashnani stopped the highway | दलित वस्तीप्रश्नी महामार्ग रोखला

दलित वस्तीप्रश्नी महामार्ग रोखला

Next

जयसिंगपूर : उदगाव (ता़ शिरोळ) येथील दलित वस्ती गेल्या काही महिन्यांपासून सोयी-सुविधा न पुरविल्यामुळे दलदलीने व्यापली आहे़ याच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी अकरा वाजता कोल्हापूर-सांगली महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले़ दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासन, नायब तहसीलदार यांना धारेवर धरले़ दरम्यान, ग्रामपंचायतीचे लेखी पत्र, तहसीलदार पिलारी यांच्या ठोस आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़मात्र, चार दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दलित वस्तीतील नागरिकांनी दिला आहे़
येथील पूरग्रस्त हौसिंग सोसायटीच्या दलित वस्तीत गेल्या काही महिन्यांपासून सोयी-सुविधा मागासवर्गीय पंधरा टक्के रक मेतून पुरवा, अशी मागणी केली होती़ दरम्यान, ग्रामपंचायतीने मागासवर्गीय निधी अन्य ठिकाणी खर्च केला आहे. यामुळे दलित वस्तीचा विकास खुंटला आहे़ या सर्व बाबींची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, असे निवेदन रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमरदीप कांबळे यांनी जिल्हाधिकारी व जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दिले आहे़
दलित वस्तीतील प्रश्न सोडविण्यासाठी शनिवारी चर्चा आयोजित केली होती़ यावेळी नायब तहसीलदार वैभव पिलारी, प्रभारी बीडीओ डॉ़ कराळे, स.पो.नि. संतोष डोके, ग्रामविकास अधिकारी संजय बर्डे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक निष्फळ झाल्याने संतप्त नागरिकांनी पदाधिकाऱ्यांना दलित वस्तीत झालेली दुरवस्था पाहण्यासाठी नेले़ यावेळी नागरिकांनी सर्व पदाधिकाऱ्यांना जाब विचारून धारेवर धरले़
नागरिकांनी एवढ्यावरच न थांबता सर्व पदाधिकांऱ्याच्या समोरच कोल्हापूर-सांगली महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले़ यावेळी सुमारे अर्धा तास महामार्ग रोखल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती़यावेळी ग्रामपंचायतीने लेखी पत्र दिल्यानंतर, तसेच नायब तहसीलदार यांनी चार दिवसांत दलित वस्तीप्रश्नी बैठक घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा ठोस निर्णय दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़ यावेळी उपसरपंच प्रकाश बंडगर, शांताराम पाटील, भरत वरेकर, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़ या आंदोलनात प्रेमनिहाल रांजणे, सुभाष उदगावे, प्रमोेद कज्जे, यांच्यासह कार्यकर्ते होते़ (प्रतिनिधी)

Web Title: The Dalit Vasti Prashnani stopped the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.