लग्न ठरवण्याच्या बहाण्याने घरातील दागिन्यांवर डल्ला; फुलेवाडीच्या वधू-वर सूचक केंद्र चालकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 10:25 PM2023-06-29T22:25:03+5:302023-06-29T22:25:26+5:30
कोल्हापूर : लग्नासाठी मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने वधू-वर सूचक केंद्रात बोलवून, त्यांच्या घराच्या चाव्या घेऊन नंतर घरातील १२ तोळे दागिन्यांवर ...
कोल्हापूर : लग्नासाठी मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने वधू-वर सूचक केंद्रात बोलवून, त्यांच्या घराच्या चाव्या घेऊन नंतर घरातील १२ तोळे दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी गुरुवारी (दि. २९) अटक केली. रोहन रवींद्र चव्हाण (वय २५, रा. फुलेवाडी, कोल्हापूर) असे चोरट्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याच्याकडून चोरीतील १२ तोळे दागिने आणि दुचाकी असा साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
अटकेतील संशयित आरोपी रोहन चव्हाण याचे फुलेवाडी परिसरात वधू-वर सूचक केंद्र आहे. फुलेवाडी रिंगरोड येथील विपुल सूर्यकांत चौगुले यांचे लग्न ठरवण्याचे काम सुरू आहे. त्यातून संशयित रोहन आणि फिर्यादी विपुल यांची ओळख झाली. आठ जूनला विपुल हे वडिलांसोबत चव्हाणच्या वधू-वर सूचक केंद्रात गेले. त्यावेळी चव्हाणने सरबत आणण्याच्या बहाण्याने सूर्यकांत चौगुले यांच्या सायकलची चावी मागून घेतली. चाव्यांच्या झुबक्यातील घराच्या चावीची बनावट चावी करून घेतली. त्यानंतर चौगुले कुटुंबीय घरात नसल्याचे पाहून त्याने घरातील १२ तोळे दागिने लंपास केले. चोरीचा प्रकार लक्षात येताच विपुल चौगुले यांनी २४ जूनला करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला संशयित रोहन चव्हाण याची माहिती मिळाली. गुरुवारी तो चोरीतील दागिने विक्री करण्यासाठी फुलेवाडी ते रंकाळा रोडवर येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडे चोरीतील सुमारे चार लाख रुपये किमतीचे १२ तोळे दागिने मिळाले. गुन्ह्यासाठी वापरलेल्या दुचाकीसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
यांनी केली कारवाई -
पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलिस अंमलदार प्रीतम मिठारी, प्रशांत कांबळे, सागर चौगले, संदीप गायकवाड, राजेंद्र वरंडेकर, सचिन बेंडखळे, सुप्रिया कात्रट यांनी ही कारवाई केली.