धरण कर्नाटकचे फायदा शिरोळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:24 AM2021-03-23T04:24:47+5:302021-03-23T04:24:47+5:30

संदीप बावचे जयसिंगपूर : कर्नाटकातील हिप्परगी बॅरेजच्या बॅकवॉटरमुळे शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना सध्या पाण्याचा फायदा होत ...

The dam benefited Karnataka | धरण कर्नाटकचे फायदा शिरोळला

धरण कर्नाटकचे फायदा शिरोळला

Next

संदीप बावचे

जयसिंगपूर : कर्नाटकातील हिप्परगी बॅरेजच्या बॅकवॉटरमुळे शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना सध्या पाण्याचा फायदा होत आहे. हिप्परगीच्या बॅकवॉटरमुळे राजापूर बंधाऱ्यावर बरग्याविना दहा फुट पाणी पातळी आहे. गतवर्षी झालेला चांगला पाऊस यामुळे मार्च संपत आला तरी बरगे घालण्याची गरज नाही, अशी परिस्थिती आहे. धरण कर्नाटकचे फायदा शिरोळ तालुक्याला होत आहे.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराला कर्नाटकातील अलमट्टीचे धरण जबाबदार असल्याचा आरोप होत असतानाच गेल्या दोन वर्षांपासून शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यापासून ९२ किलोमीटर अंतर असणाऱ्या कर्नाटकातील हिप्परगी धरणाच्या बॅकवॉटरमुळे राजापूर बंधाऱ्यावर ऐन उन्हाळ्यातही बरगे घालण्याची आवश्यकता भासत नसल्याचे चित्र आहे. अलमट्टीमुळे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका हे कर्नाटक शासन मान्य करायला तयार नाही. तर महाराष्ट्र शासनाकडून महापुराची कारणेच शोधली जात आहेत.

दरम्यान, राजापूर बंधाऱ्याच्या बॅकवॉटरवर शिरोळ तालुक्यातील अनके गावे अवलंबून आहेत. गेली ३९ वर्षे हा बंधारा वरदान ठरला आहे. गेल्या दोन वर्षापासून कर्नाटकातील हिप्परगीच्या बॅकवॉटरमुळे राजापूर बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना पाण्याचा फायदा होत आहे. गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बॅकवॉटरचे पाणी होते. त्यामुळे राजापूर बंधाऱ्यावर मार्चपर्यंत बरगे घालण्याची आवश्यकता भासली नव्हती. पाटबंधारे विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राजापूर बंधाऱ्यावर साडेचौदा फुट पाणी पातळी होती, तर सोमवारी (दि. २२) ही पाणी पातळी दहा फुट होती. महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील जवळपास ४०हून अधिक गावांना हिप्परगीच्या बॅकवॉटरमुळे पाण्याचा फायदा होत आहे. राजापूर बंधाऱ्यावरील पाणीपातळी सात फुटांपर्यंत गेल्यानंतरच बरगे घालण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. एकूणच धरण कर्नाटकचे फायदा महाराष्ट्राला असेच चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे.

......

आतापासूनच नियोजन हवे

यावर्षीही नियोजनाची गरज

गतवर्षी महाराष्ट्र व कर्नाटक शासनाच्या समन्वयामुळे महापुराचा धोका टळला होता. जूनपासून पावसाळा सुरू होणार आहे. गतवर्षीप्रमाणेच समन्वय ठेवून महापुराचा धोका टाळण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे. शिवाय, हिप्परगीच्या बॅकवॉटरवर अभ्यासाची गरजदेखील आहे.

फोटो - २२०३२०२१-जेएवाय-०४

फोटो ओळ - शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्याचे संग्रहित छायाचित्र.

Web Title: The dam benefited Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.