सुळे-आकुर्डे दरम्यान असणाऱ्या धरणाचे पिलर अर्धवट ढासळल्याने धरण धोकादायक स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:14+5:302021-06-16T04:32:14+5:30
सुळे-आकुर्डे धरणावरून आसपासच्या अनेक गावांतून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. तसेच ऊस हंगामात याच धरणावरुन कुंभी-कासारी कारखाना कुडित्रे व ...
सुळे-आकुर्डे धरणावरून आसपासच्या अनेक गावांतून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. तसेच ऊस हंगामात याच धरणावरुन कुंभी-कासारी कारखाना कुडित्रे व डी.वाय. पाटील आसळज कारखान्याकडे भागातून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूकही होत असते. त्याचबरोबर ५0 ते ६0 वर्षांपासून असणारे हे धरण सुळे-आकुर्डे सह
परिसरातील ४00 ते ५00 हेक्टर जमिनीच्या पाणी सिंचनासाठी खूप महत्त्वाचे ठरले आहे. या धरणाचे जवळपास २१ पिलर आहेत. त्यापैकी चार पिलर हे अर्धवट तुटलेले आहेत, त्यामुळे त्यावरून अवजड वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. तसेच दरवर्षी धरणात मोठ्या प्रमाणात लाकडी ओंडके व कचरा अडकलेला असतो. परिणाम पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. गतवर्षी तर या बंधाऱ्यावर मोठ्या भेगा पडल्या होत्या व यावर्षी पिलर ढासळल्याने धरणाची टिकाऊ क्षमता संपत आलेली आहे.
त्यामुळे प्रशासन व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचे तत्काळ काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य ती कार्यवाही करून पावसाळ्याअगोदर हे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक व वाहनधारकातून होत आहे.
चौकट
संबंधित धरणासंदर्भात गेली दहा वर्षे आम्ही पाठपुरावा करत आहोत. माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह विद्यमान आमदार यांच्याकडे वारंवार निवदने दिली आहेत. तसेच तीन वर्षांपूर्वी पर्यायी पुलाचा सर्व्हेही झालेला आहे.
त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी संबंधित पुलाची दुरुस्ती व नवीन पुलासंदर्भात लवकरात लवकर तोडगा काढावा व सद्यस्थितीत धरणाच्या पिलरांची तत्काळ दुरुस्ती करावी.
रेखा विलास बोगरे (सुळे)
पंचायत समिती पन्हाळा सदस्य
फोटो ओळ-सुळे-आकुर्डे, ता. पन्हाळा दरम्यान असणाऱ्या धरणाचे पिलर अर्धवट पडल्याने धरण धोकादायक स्थितीत आहे.