बुडित क्षेत्रातील घरांच्या मोजणीला धरणग्रस्तांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:24 AM2021-05-06T04:24:20+5:302021-05-06T04:24:20+5:30
आजरा: सर्फनाला धरणाच्या बुडित क्षेत्रातील सध्या अस्तित्वात असणारी घरे, गोठे, झाप यांची ...
आजरा: सर्फनाला धरणाच्या बुडित क्षेत्रातील सध्या अस्तित्वात असणारी घरे, गोठे, झाप यांची मोजणी करून सर्वांची नुकसानभरपाई देण्याची लेखी हमी द्यावी. अन्यथा बुडित क्षेत्रातील घरांच्या मोजणीस धरणग्रस्तांचा विरोध राहील, असे सांगत धरणग्रस्तांनी आज घरांच्या मोजणीचे काम बंद पाडले.
धरणाचे काम सुरू होऊन सुमारे वीस वर्षांचा कालावधी लोटला आहे. दरम्यानच्या काळात धरणग्रस्तांनी आपल्या कौटुंबीक गरजेपोटी राहत्या घरांची दुरुस्ती केली आहे.
जनावरांसाठी गोठा, झाप व पडवी यांचे विस्तारीकरण केले आहे. त्याचबरोबर कुटुंबाच्या उपजीविकेसाठी पाळीव जनावरांसाठी गोठा बांधणी ही केलेली आहे. धरण होणार आहे, आपण बुडीत क्षेत्रात आहोत, असे म्हणून या अतिमहत्त्वाच्या गोष्टी आम्ही थांबवू शकत नाही. आमच्या जगण्यासाठी अतिगरजेच्या गोष्टी धरणग्रस्तांना कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे शासनाने या सर्वांची मोजणी करून त्याप्रमाणे भरपाई देणे गरजेचे आहे. याबाबत शासनाची भूमिका अद्यापि स्पष्ट नसल्याने आमचा घरांच्या मोजणीच्या कामाला विरोध आहे, असेही धरणग्रस्तांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. भरपाई देण्याबाबत लेखी हमी दिल्याशिवाय मोजणी प्रक्रिया सुरू करण्यास आमचा विरोध आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर राहील, असेही निवेदनात नमूद केले आहे. मोजणीसाठी पोलीस बंदोबस्तात आलेल्या आलेल्या अधिकाऱ्यांना मोजणी न करताच धरणग्रस्तांनी परत पाठवले
धरणग्रस्तांनी मोजणीच्या कामाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवत धरणाच्या मोजणीच्या कामाला विरोध केला व काम थांबविले.
फोटोकॅप्शन.
- सर्फनाला धरणाच्या बुडित क्षेत्रातील घरांच्या मोजणीला विरोध करताना धरणग्रस्त.