धरणाचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:26 AM2021-04-09T04:26:51+5:302021-04-09T04:26:51+5:30
मलकापूर : आंबर्डे (ता. शाहूवाडी) येथील शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या वतीने सुरू असलेल्या धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे ...
मलकापूर : आंबर्डे (ता. शाहूवाडी) येथील शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या वतीने सुरू असलेल्या धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे सहा गावांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी रानावनात फिरणाऱ्या महिलांना आपल्या हक्काचे पाणी मिळणार आहे. शेतीला बंदिस्त कालव्यातून मीटरद्वारे पाणी दिले जाणार आहे.
आंबर्डे गावच्या हद्दीत शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या जलसंधारण विभागाच्या वतीने लघू पाटबंधारे तलाव मंजूर झाला आहे. या तलावामुळे १४५ हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे; तर सहा गावांतील शेतकऱ्यांना शेती व पिण्याचे पाणी मिळणार आहे. २०१८ साली धरणाचे काम सुरू झाले आहे. काम बंद नसल्यामुळे अंतिम टप्प्याकडे कामाची वाटचाल सुरू आहे. धरणात १६५८ स. घ. मी. एवढा पाणीसाठा होणार आहे. आमदार विनय कोरे, माजी बांधकाम सभापती, जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे धरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. धरणाच्या भरावाचे व पिचिंगचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. धरणात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या त्यांना मोबदला म्हणून दोन कोटी ३४ लाख रुपयांचे वाटप केले गेले आहे. बंदिस्त कालव्याचे काम पुढील हंगामात केले जाणार आहे. शेतीला बंदिस्त कालव्यातून पाणी दिले जाणारे आहे. कार्यकारी अभियंता धनाजी पाटील, शाखा अभियंता विपुल खोत, ठेकेदार आनंदराव पाटील यांनी समन्वयातून काम प्रगतिपथावर नेले आहे.
फोटो
आंबर्डे (ता. शाहूवाडी) येथे धरणाचे काम अंतिम टप्प्यात सुरू असताना.