विराेधी आघाडी नेत्यांना डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:23 AM2021-03-28T04:23:46+5:302021-03-28T04:23:46+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’च्या निवडणुकीत विरोधी आघाडीने रोज बैठकांचा सपाटा लावला आहे. त्यामाध्यमातून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकूळ’च्या निवडणुकीत विरोधी आघाडीने रोज बैठकांचा सपाटा लावला आहे. त्यामाध्यमातून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेचे आ. प्रकाश आबीटकर हे आज, रविवारी कोल्हापुरात येत असून ते प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेण्याची शक्यता आहे.
‘गोकूळ’साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्यास तीन दिवस सुटी असली तरी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. सत्तारूढ संचालकांनी ठरावधारकांच्या गाठीभेटी सुरू ठेवल्या आहेत. ‘गोकूळ’ बचाव मंचच्या माध्यमातून विरोधी आघाडीकडून इच्छुक असलेल्यांची संपर्क मोहीम जोरात आहे. हे असताना सत्तारूढ नेत्यांमध्ये सावध हालचाली सुरू आहेत. विरोधी आघाडीतील एक-एक नेता, माजी संचालक आपल्याकडे वळवण्यासाठी राधानगरी तालुक्यातील एका नेत्यावर जबाबदारी सोपवली आहे. तेच सर्वांच्या गाठीभेटी घेत असून भक्कम पॅनल बांधणीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
विरोधी आघाडीकडूनही बैठकांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी सायंकाळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खा. संजय मंडलिक, आ. विनय कोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आ. चंद्रदीप नरके यांची बैठक झाली. यामध्ये आ. राजेश पाटील यांच्यासह आ. प्रकाश आबीटकर यांच्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर कोणाचे अर्ज दाखल करायचे राहिले आहेत, कोणाला सांगायचे, याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.
राजेश पाटील यांच्याशी चर्चा
आ. राजेश पाटील यांच्याशी शनिवारी रात्री शासकीय विश्रामगृहात मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील, खा. संजय मंडलिक, आ. विनय कोरे यांच्यासोबत बैठक झाली. यामध्ये त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.