बंडारू दत्तात्रेय यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
By admin | Published: January 22, 2016 12:05 AM2016-01-22T00:05:22+5:302016-01-22T00:54:26+5:30
हैदराबाद विद्यापीठातील आत्महत्या : ‘एनएसओवायएफ’चे आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, रास्ता रोको
कोल्हापूर : हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येस कुलगुरू अप्पा राव, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तसेच ‘अभाविप’ जबाबदार आहेत, असा आरोप करीत नॅशनल एस. सी., एस.टी., ओ.बी.सी. स्टुडंट्स अॅँड युथ फ्रंटतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करीत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी बंडारू दत्तात्रय यांचा पुतळा दहन करून रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यावर पुन्हा ‘रास्ता रोकोे’चा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले व काही वेळानंतर त्यांची सुटका केली.
दुपारी साडेबाराच्या सुमारास आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. सोबत त्यांनी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांचा प्रतीकात्मक पुतळा आणला होता. याची चाहूल पोलिसांना लागताच त्यांनी पुतळा काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक व पोलीस यांच्या झटापट झाली. तरीही आंदोलकांनी हा पुतळा दहन करून ‘बोंब मारो’ आंदोलन केले. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी थेट रस्त्यावर धाव घेत ‘रास्ता रोको’ केला. यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली. काही महिला आंदोलक तर थेट रस्त्यावरच झोपल्या. यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढत प्रशासनाच्या परवानगीनुसार त्यांना कार्यालयाच्या गेटसमोर निदर्शने करण्याची सूचना केली. त्यानुसार सर्व आंदोलक या ठिकाणी आले व तीव्र निदर्शने सुरू केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित कांबळे म्हणाले, रोहित वेमुला याच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय व स्मृती इराणी यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच वेमुला यांच्या कुटुंबीयांना सरकारने ५० हजार रुपयांची भरपाई द्यावी. या मागणीसाठी संघटनेतर्फे देशभर आंदोलन सुरू आहे.
जिल्हाध्यक्ष स्वप्निल कांबळे म्हणाले, वेमुला यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांना अॅट्रासिटी अॅक्ट व खुनाच्या गुन्ह्याखाली अटक करावी, अशी आमची मागणी आहे.
यानंतर निवेदन देण्यास शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना भेटायला गेले असता, त्यांना ताटकळत ठेवत भेट न दिल्याबद्दल संतप्त आंदोलकांनी पुन्हा रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला. ते आंदोलन करायला जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गाडीत घातले व पोलीस ठाण्यात नेले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. आंदोलनात कोमल कांबळे, नीलेश कांबळे, प्रज्ञा कांबळे, पंकज कांबळे, वैैभव कांबळे, दीपाली आवळे, शशी कांबळे, चंद्रकांत गवंडी, सुभाष माने, आदींसह महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
वेमूला हत्याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करा
कोल्हापूर : हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमूला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित प्रशासन व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी गुरुवारी दसरा चौकातील शाहू महाराज पुतळा येथे धर्मनिरपेक्ष विद्यार्थी युवक संघटना संघर्ष समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यासह घटनेशी संबंधित मंत्री व कुलगुरूंना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. दसरा चौकात झालेल्या आंदोलनात माजी नगरसेवक आदिल फरास, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवराज साळोखे, गिरीष फोंडे, आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे प्रशांत आंबी, आरती रेडेकर, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे गौतम कांबळे, नितीन म्हस्के, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे नीलेश चव्हाण, रणजित चव्हाण, भारिप बहुजन महासंघ युवा आघाडीचे प्रशांत वाघमारे, रिपब्लिकन सेना युवा आघाडीचे संभाजी गुदगे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.