डॉल्बीवर नाचण्याच्या नादाने संसारच उघड्यावर !
By admin | Published: September 30, 2015 12:27 AM2015-09-30T00:27:43+5:302015-09-30T00:36:06+5:30
वैभव ऐनापुरेचा मृत्यू : कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का
कोल्हापूर : डोळे दीपवून टाकणारे लाईट इफेक्टस आणि डॉल्बी सिस्टीमच्या तालावर कार्यकर्त्यांचा जल्लोष, हा माहौल पाहण्यासाठी हजारो नागरिक रविवारी रस्त्यांवर आले होते. हा जल्लोष अनुभवण्यासाठी ‘तो’ही सायंकाळी घराबाहेर पडला होता. डॉल्बीच्या ठेक्यावर त्यालाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र, याच डॉल्बीच्या आवाजाच्या धक्क्याने हृदयविकाराचा झटका आल्याने वैभव ऐनापुरे या युवकाला आपला जीव गमवावा लागला. राजारामपुरीतील ‘स्वामी पाणीपुरवठा’जवळ राहणारे वैभव आदिनाथ ऐनापुरे हे एका खासगी कंपनीत कामाला होते. आई लहानपणीच, तर वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाल्याने वैभव यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी होती. वैभव व त्यांची पत्नी हे दोघेजणच घरी असतात. गणेश विसर्जन मिरवणुकीदिवशी सायंकाळी चार वाजता ते घरातून चहा घेऊन आपल्या काही मित्रांसोबत बाहेर पडले. एका मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना काही वेळात अस्वस्थ वाटू लागल्याचे त्यांनी मित्रांना सांगितले. मित्रांनी त्यांना मिरवणुकीतून बाजूला नेले व ताराबाई रोड, बाबूजमाल दर्ग्याजवळ बसविले. यावेळी एका मित्राने लिंबूपाणी पिण्यास दिले. यावेळी उलट्या सुरू झाल्याने त्यांना ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
वैभव यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. वैभव यांच्या एका बहिणीचे लग्न झाले असून, सध्या त्या इस्लामपूर येथे असतात. त्यामुळे वैभव यांच्या पत्नीचा आधार गेला आहे. ही बातमी समजताच नागरिकांची त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. प्रत्येकजण वैभव यांची पत्नी मीरा व त्यांची बहीण वैशाली देसाई यांना आधार देत आहेत. मात्र, वैभवच्या जाण्याने घरची कमावती व्यक्तीच गेल्याने ‘आता घर कसे चालवायचे,’ असा प्रश्न पत्नीला पडला आहे.