कालव्यालगत खोदाई केल्याने तिलारी कालव्याला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 05:22 PM2019-08-02T17:22:56+5:302019-08-02T17:29:10+5:30
बांदा - सटमटवाडी येथे आरटीओ विभागाचा तपासणी नाक्याच्या ठेकेदाराने विनापरवाना व बेकायदा काम युद्ध पातळीवर सुरु आहे. संबंधित ठेकेदाराने कालवा विभागाच्या क्षेत्रात अतिक्रमण करून कालव्यालगत खोदाई केल्याने कालव्याला धोका निर्माण झाल्याचा अहवाल तिलारी कालवा उपविभागाने सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्याच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे.
बांदा : बांदा - सटमटवाडी येथे आरटीओ विभागाचा तपासणी नाक्याच्या ठेकेदाराने विनापरवाना व बेकायदा काम युद्ध पातळीवर सुरु आहे. संबंधित ठेकेदाराने कालवा विभागाच्या क्षेत्रात अतिक्रमण करून कालव्यालगत खोदाई केल्याने कालव्याला धोका निर्माण झाल्याचा अहवाल तिलारी कालवा उपविभागाने सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्याच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे.
याबाबत वारंवार लक्ष वेधूनही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अहवालातून केला आहे. नाक्याच्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदाराने हम करे सो कायदा या आविभार्वात विनापरवाना व बेकायदा कामांचा सपाटाच लावला.
विनापरवाना पाच हजार वृक्षांची तोड, अनधिकृत खनिजयुक्त माती उत्खनन व विक्री, अनधिकृत बांधकामे, कालव्यालगत खोदाई केली. नैसर्गिक पाणवठे नष्ट केले. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडूनही कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नाही. याविरोधात शेतकरी साईप्रसाद कल्याणकर यांनी लढा दिला.
बांदा शाखा कालव्यालगत केलेल्या खोदाईकडे लक्ष वेधल्यानंतर तिलारी कालवा उपविभाग जागा झाला. खोदाईमुळे कालव्याला धोका निर्माण झाल्याने एमएसआरडीसीचे लक्ष वेधले. मात्र, संभाव्य धोका टाळण्यासाठी ठेकेदार कंपनीने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे कालव्यालगतची माती ढासळून कालवा कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
तसा तब्बल आठ पानी अहवाल तिलारी कालवा उपविभागाने सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या बांधकाम विभागाला सादर केला आहे. यात टोलनाक्याच्या ठेकेदारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.